चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर दमानियांची पुन्हा टीका ; म्हणाल्या तटकरेंनाही सोडणार नाही !


Following Chakankar’s Resignation, Damaniya Criticizes Again; Vows Not to Spare Tatkare Either! मुंबई (21 मार्च 2026) : रुपाली चाकणकर यांनी एखाद्या मॉडेलसारखा राजीनामा दिला. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती. एक अहंकार असल्याने त्यांना इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. सुनील तटकरे या प्रकरणापासून कितीही पळाले तरी त्यांना सोडणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

चाकणकरांचीही व्हावी चौकशी
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या या राजीनाम्यावर निशाणा साधला. चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी एखादे प्रकरण दाबले का? याची चौकशी करण्याचीही मागणी केली.


चाकणकरांवर गुन्हा दाखल करून चौकशी करा
अंजली दमानिया म्हणाल्या, रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिला. महिला आयोग हा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असतो. पण त्यांचे अध्यक्षपद अशोक खरातसारख्या भोंदू माणसाला आधार देण्यातच गेले. या प्रकरणी त्यांचा केवळ राजीनामा घेणे पुरेसे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असल्याने या पदावर बसून त्यांनी भोंदू खरात विरोधातील केसेस दाबल्या असण्याची शक्यता आहे. त्यावर कडक कारवाई व्हायला हवी.

तटकरे कितीही पळाले तरी मी सोडणार नाही
मी काल सुनील तटकरेंची देहबोली पाहिली. ते घाबरल्याचे दिसून आले. ते संतापून पळून गेले. पण ते कितीही पळाले तरी मी सोडणार नाही. हे सर्व जण ओशनो जल घ्यायचे. त्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांचे राजकारणी खरातकडे गाड्या व हेलिकॉप्टर पाठवायचे. शिर्डीच्या नावाने खरातच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार्‍या या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजे. या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण घाण झाले आहे. ही घाण आता स्वच्छ करण्याची वेळ आल्याचे दमानिया म्हणाल्या.

सुनेत्रा पवारांवरही साधला निशाणा
अंजली दमानिया यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही निशाणा साधला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. पण त्या गत तीन दिवस हा सर्व प्रकार पाहत राहिल्या. त्यांनी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर लगेचच ठोस असे काहीतरी करण्याची गरज होती. पण तीन दिवसांनी जेव्हा कळस गाठला, सर्वांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला.

राजीनामा स्वीकारताना त्यांचा चेहरा गंभीर होता. पण चाकणकर मॉडेलिंग केल्यासारखी पोज देत उभ्या होत्या. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद किंवा विनम्रता नव्हती. एक अहंकार होता. हे पाहून चाकणकरांना खरेच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज असल्याचे वाटते, असे दमानिया म्हणाल्या.

सुषमा अंधारेंचे केले कौतुक
अंजली दमानिया यांनी यावेळी सुषमा अंधारे यांचेही कौतुक केले. त्या म्हणाल्या, सुषमा अंधारे यांनीच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. त्यांनी फोटो, पुराव्यांसह हे प्रकरण मांडले. आता चाकणकरांनी अनामिका कापल्याच्या दाव्यावर अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हव्या तेवढ्या डिफेमेशन केस टाकाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !