स्व.अजितदादांचा घातपात असल्यास कुणाच्या बापालाही सोडणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई (25 मार्च 2026) : माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचा घातपाती मृत्यू असल्यास कुणाच्याही बापाला आपण सोडणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान अपघाताचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत तसह तपासाचे तपशीलही मांडले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवर देखील फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले.

अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीची टाईम लाइन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ अ‍ॅनलायझर टेस्ट 28 तारखेला सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी व कोपायलट शांभवी पाठक यांची टेस्ट सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली. या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही. अजित पवार हे देवगिरी निवसस्थानवरून विमानतळावर सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी पोहोचले. अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विमानात बसले आणि विमान सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण झाले. मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले आहेत. मुंबईच्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार आल्याचे तसेच विमानात बसल्याचे दिसते परंतु बारामती विमानतळावर सदर विमान लॅण्ड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले.


एसपी दर्जाच्या अधिकार्‍याकडे तपास
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा सन्माननीय रोहित पवार आणि इतरही अनेकांनी हा मांडला आहे. मी सुरुवातीला याची वस्तुस्थिती मांडतो. दिनांक 28.1.2026 रोजी बारामती विमानतळ येथे धावपट्टी लगत व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात केंद्र सरकारने जी काही एसओपी आहे त्यांची कारवाई सुरू केली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देखील आपण चौकशी दिली आहे. सीआयडी याचा तपास एसपी दर्जाच्या अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे.

पोस्ट्मॉर्टम रिपोर्टमध्ये काय आढळून आले?
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सदर प्रकरणी पोस्ट्मॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर चार यांचे मृत्यूचे कारण डेथ ड्यू टु मल्टिपल इन्जुरीज असोसियटेड विथ बर्न इन्जुरीज असे देण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व सदस्यांचे डीएनए अहवाल आले असून ते त्यांच्या नातेवाईकांशी जुळले आहेत. पायलट व कोपायलट यांचा व्हीसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे निष्पन्न होत नाही.

दुर्घटनाग्रस्त विमानातील सर्व मृत पावलेल्या सर्व पाच जणांचा व्हीसेरा व रक्त तपासणीत विषाचा अंश आढळून आलेला नाही तसेच विमानातील स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक शाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे. अजितदादा यांच्याशी संबंधित लोकांशी चौकशी करण्यात आली असता सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याचे आढळून आले नाही.

झीरो एफआयआर कर्नाटक सरकारला दाखल करून घेण्याचा अधिकार नाही
रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही व्यक्त केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. झिरो एफआयआर म्हणजे काय? हे सांगताना कर्नाटक सरकारला अशा प्रकारचा एफआयआर दाखल करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. अजितदादांच्या अपघातामागे घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.

एफआयआर दाखल होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न का करावे? अजितदादांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अगोदर एडीआर होतो. एडीआर नंतर एफआयआरमध्ये रुपांतरीत होतो. या अपघाताप्रकरणी कर्नाटकमध्ये झीरो एफआयआर दाखल झाला परंतु हा झिरो एफआयआर हा बेकायदेशीर आहे. कर्नाटकला हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी पीडित एफआयआर करण्याच्या स्थितीत नसेल, तेव्हाच पीडित व्यक्तीला झिरो एफआयआर करता येतो. झिरो एफआयआर दाखल करणे हे कर्नाटक सरकारच्या अधिकारातच नाही, असा कायदा यावेळी फडणवीस यांनी सांगितला.

कोणाच्याही बापाला सोडणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर न्यायालय एफआयआर दाखल करा, असे निर्देश देते. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केले आहे, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आम्ही आकाश पातळ एक करू. अजितदादांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणाच्याही बापाला सोडणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !