काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप ; भोंदूच्या सांगण्यावरून अधिकार्यांच्या बायकांचे स्वॅपिंग !
मुंबई (30 मार्च 2026) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचे मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकार्यांशी संबंध होते. इतकेच नव्हे तर तो या अधिकार्यांना एकमेकांच्या पत्नींसोबत संबंध ठेवण्याचा सल्ला देत असल्याचा दावा त्यांनी केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मोबाईलमध्ये नावे कोडवर्डमध्ये सेव्ह
वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, अशोक खरातच्या मोबाईलमध्ये अनेकांची नावे कोडवर्डमध्ये सेव्ह करण्यात आली होती. यामागे कारण असे की, तो अनेकांचे काळे पैसे पांढरे करण्याचे काम करत होता, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ काही व्यक्तींवर कारवाई करून चालणार नाही, तर ज्या 49 आमदारांचे फोटो खरातसोबत आढळले आहेत, त्या सर्वांची चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

सरकारी अधिकार्यांचा खरातकडे राबता
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे अनेक सरकारी अधिकारी आपल्या कुटुंबियांसह खरातकडे जात असल्याचेही समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये पती स्वतःच्या पत्नींना खरातकडे पाठवत असल्याचे आरोप आहेत. अशा व्यक्तींनाही तितकेच दोषी धरले पाहिजे आणि त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून मोठ्या जाळ्याचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभावशाली व्यक्तींच्या पत्नी खरातच्या ऑफिसमध्ये
वडेट्टीवार यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या पत्नी खरातच्या ऑफिसमध्ये जात असत आणि त्यांचे नवरे बाहेर थांबत असत मात्र आत नेमके काय घडत होते याबाबत ठोस पुरावे नसल्याने त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. सध्या समोर येणारे व्हिडिओ हे निवडक असल्याचेही त्यांनी नमूद केले. खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये सुमारे हजार व्हिडिओ असल्याचा दावा असून त्यापैकी केवळ 150 व्हिडिओच बाहेर आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे प्रकरण
या संपूर्ण प्रकरणावर टीका करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, हे अत्यंत घाणेरडे आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारे प्रकरण आहे. तरीही सरकारकडून संबंधित अधिकार्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले.




