राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाने दणाणले भुसावळ शहर

भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा मोर्चेकर्‍यांकडून निषेध : मूलभूत सुविधांचे विषय वेठीला


Bhusawal City Resounds with the ‘Akrosh Morcha’ of the NCP and Shiv Sena भुसावळ (6 एप्रिल 2026) : भाजपाची दादागिरी चालणार नाही, विकासकामांना आडकाठी आणणार्‍यांचा निषेध असो, दिव्यांग बांधवांना हक्काचा निधी मिळालाच पाहिजे यासह विविध घोषणा देत भुसावळातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उबाठा गटातर्फे सोमवारी दुपारी 11.45 वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आक्रोश मोर्चात अग्रभावी दिव्यांग बांधव तसेच डोक्यावर हंडा ठेवलेल्या महिला होत्या व मोर्चेकर्‍यांच्या जोदार घोषणांनी शहर दणाणले होते.

भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध
भुसावळ पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने पहिल्या सभेतील 177 विषयांना विरोध दर्शवत हे विषय रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल दाखल केले आहे. एकीकडे शहरात विकासकामे होत नसल्याची ओरड करायची व दुसरीकडे शहराच्या विकासाच्या कामांना विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका भाजपा घेत असल्याने याचा परिणाम शहराच्या विकासावर होत असून त्या निषेधार्थ भुसावळातील राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उबाठा गटाकडून सोमवारी ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले.


दिव्यांग बांधवांसह महिलांचाही सहभाग
आक्रोश मोर्चाच्या अग्रभागी व्हील चेअरवर दिव्यांग बांधव सहभागी झाले तसेच महिलांनी डोक्यावर हंडा घेत लक्ष वेधले शिवाय पदाधिकार्‍यांनी भुसावळचा विकास अडवणार्‍यांविरोधात एल्गार, दिव्यांग बांधवांना हक्काचा निधी मिळायला पाहिजे, थोर महापुरूषांच्या स्मारकांची दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी विरोध का? आदी आशयाचे बॅनर झळकावून शहरवासीयांचे लक्ष वेधले तसेच यावेळी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेविरोधात गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

यांचा मोर्चात सहभाग
आक्रोश मोर्चात कामगार नेते जगन सोनवणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजय दामू पाटील, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेवक अकिल पिंजारी, जयंत लोणारी, दुर्गेश ठाकूर, गणेश सोनवणे, साजीद पठाण, कुरेशी, माजी नगरसेवक समीर कर उर्फ धोनी, मुकेश गुंजाळ, शिवसेनेचे विनोद चौधरी, दीपक कुलकर्णी यांच्यासह संविधान आर्मीचे युवा जिल्हाध्यक्ष दीपक सुरवाडे, प्रफुल्ल निकम, हरीष सुरवाडे, जयराज पुरभी, रिजवान शेख तसेच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मागण्या मान्य न झाल्यास 9 एप्रिलला लाँग मार्च
मोर्चेकर्‍यांनी यावेळी प्रांताधिकारी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. स्मशानभूमीत लाकूड, दिव्यांगांना निधी, अल्पसंख्यांक समाजासाठी सभागृह, मुस्लीम कब्रस्थानसाठी भिंती, महिला पुरूषांसाठी आधूनिक शौचालय यासह विविध शहर विकासाच्या विषयांना भाजपा आडकाठी आणत असल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. भुसावळचा विकास होण्यासंदर्भात प्रशासन स्तरावरून दखल घ्यावी अन्यथा 9 एप्रिल रोजी भुसावळ ते जळगाव लाँग मार्च काढण्याचा इशारा यावेळी कामगार नेते जगन सोनवणे यांनी दिला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !