भुसावळात महावितरणचा मनमानी कारभार : अचूक बिलांअभावी संताप उसळला : प्रा.धीरज पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
भुसावळ (16 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील महावितरण प्रशासनाचा बेजबाबदार, ढिसाळ आणि ग्राहकविरोधी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे, फुगवलेली आणि विसंगत वीज बिले पाठवून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, बिलातील त्रृटी दुरुस्त करण्याची मागणी करणार्या ग्राहकाचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात आल्याची घटना श्रीनगर परिसरात घडली आहे.
प्रकरण काय आहे?
श्रीनगरातील रहिवासी अनिल लोखंडे यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून असामान्यरीत्या वाढीव आणि विसंगत वीज बिले येत होती. महावितरणचे कर्मचारी प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यासाठी येत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. रीडिंगमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक महावितरण कार्यालयात जाऊन बिल दुरुस्तीची मागणी केली. मात्र, प्रशासनाने आपल्या चुकीची दखल घेण्याऐवजी कोणतीही लेखी नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित केला, ज्यामुळे संबंधित कुटुंबाला अंधारात राहण्याची वेळ आली.

प्रा.धीरज पाटील यांची कठोर भूमिका
या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रा.धीरज पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. ग्राहकांना वेळेवर आणि अचूक वीज देयके देणे ही महावितरणची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने बिले आकारून नागरिकांचा छळ केला जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबवला गेला नाही, तर नागरिकांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
कायद्याचा सरळ भंग
वीज कायदा 2003 नुसार, कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी किमान 15 दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. तसेच, बिलासंदर्भातील वाद प्रलंबित असताना वीजपुरवठा तोडण्यास स्पष्ट बंदी आहे. तरीही, महावितरणकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.
प्रशासनाला अंतिम इशारा
या प्रकारामुळे श्रीनगर परिसरासह संपूर्ण भुसावळ शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दोषी कर्मचार्यांवर आणि संबंधित रीडिंग एजन्सीवर कठोर कारवाई करावी, सर्व प्रलंबित बिलांची अचूक तपासणी करून दुरुस्ती करावी आणि खंडित वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. धीरज पाटील आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


