खंडव्याजवळील भीषण अपघात वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार
Horrific Accident Near Khandavyaj: Three Members of the Same Family from Varangaon Factory Area Killed भुसावळ (18 एप्रिल 2026) : मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे पाच वाजता झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच चौघे गंभीर जखमी झाले. या अपघाताने संपूर्ण वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली.
श्याम विक्रम ठाकूर (वय 45), शोभा विक्रम ठाकूर (60) व शिवन्या श्याम ठाकूर (5) अशी मृतांची नावे आहेत.

दर्शनानंतर परतीच्या प्रवासात दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन पूर्ण करून ते आपल्या मूळ गावी परत येत असताना हा भीषण अपघात घडला. प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघातात तिघांचा जागीच मृत्यू – –
अपघातात कार चालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभाबाई ठाकूर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. लहानगी शिवन्या हिला बर्हाणपूर येथील खाजसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
परिसरात शोककळा, नातेवाईकांचा आक्रोश – –
दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती पोहोचताच शोककळा पसरली. ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजार्यांची मोठी गर्दी झाली.
स्थानिक पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

