भुसावळ नगराध्यक्षा गायत्री गौर यांची अपात्रता निश्चित ! भाजपा पदाधिकार्यांचा पत्रपरिषदेत दावा
पदाधिकारी म्हणाले, ‘त्या’ तर मूळच्या ओबीसी ; खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली
गणेश वाघ
भुसावळ (18 एप्रिल 2026) : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या गायत्री गौर-भंगाळे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आधारे निवडणूक लढवल्याचा दावा भुसावळात भाजपा पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत करीत खळबळ उडवून दिली. मुळातच गायत्री गौर या मागासवर्गीय नसून ओबीसी आहेत व समितीकडून कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर ‘त्या’ अपात्र ठरतील, असा दावादेखील यावेळी पदाधिकार्यांनी केला.
मंत्र्यांनी अडथळा आणल्याचा आरोप हास्यास्पद
भुसावळातील मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात शनिवार, 18 रोजी दुपारी भाजपने पत्रकार परिषद घेतली. नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांनी मंत्री सावकारे व त्यांच्या कुटूंबांवर केलेल्या आरोपांचे यावेळी खंडण करण्यात आले व हे आरोप हास्यास्पद असल्याचे पदाधिकारी म्हणाले. मूळात गौर या मध्यप्रदेशातील ओबीसी असून त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मागासवर्गीय म्हणून निवडणूक लढवल्याने हा एक प्रकार मागासवर्गीयांवर अन्याय असल्याची भावना पदाधिकार्यांनी बोलून दाखवली.

गायत्री भंगाळे ‘या’ तर ओबीसी : युवराज लोणारी
माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, भंगाळे यांनी त्यांच्या जात पडताळणीच्या चौकशीबाबत मंत्री संजय सावकारे हे हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करत असल्याचा दावा केला आहे मात्र हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. वास्तविक नगराध्यक्षांविरोधात कुठेही मंत्री व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी वैयक्तिकरित्या कुठेही तक्रार दाखल केलेली नाही. मूळातच गायत्री गौर या एससी चांभार असल्याचे खोट्या कागदपत्रांद्वारे भासवत आहेत. मुळातच त्यांचे संपूर्ण कुटूंब कुरमी असून ही जात ओबीसी प्रकारात मोडते, असा दावा भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी यावेळी केला. नगराध्यक्षांच्या कुटूंबांतील सदस्यांच्या जातीच्या दाखल्यांवर कुर्मी असाच उल्लेख असल्याचा दावा यावेळी कागदपत्रांच्या आधारे लोणारी यांनी केला. आम्ही आयोगाला पुराव्यादाखल काही कागदपत्रे दिली असून ती खरी आहेत वा खोटी हे आधी तपासून संबंधित विभाग निर्णय घेईल, असेही लोणारी यांनी सांगून नगराध्यक्षांनी ही निवडणूक चोरट्या मार्गाने लढवल्याचा गंभीर आरोप केला.
तर नगराध्यक्षांनी राजीनामा देत घरी बसावे
भुसावळ शहराच्या विकासाची तुम्ही वल्गना करता मात्र प्रत्यक्षात पालिकेत मंजूर झालेल्या कामांचा एक कागदही ते सरकवू शकलेले नाही. तुमच्याकडून शहराचा विकास होत नसल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, घरी बसावे व भुसावळचा विकास होवू द्यावा, असे लोणारी म्हणाले.
प्रमाणपत्रात खाडाखोड : निकी बत्रा
गायत्री भंगाळे यांनी खोटे कागदपत्रे सादर केले असून त्यात मोठ्या प्रमाणात खाडाखोड करण्यात आली असल्याचा दावा नगरसेवक निकी बत्रा यांनी यावेळी पत्रकार परिषदेत करीत संदर्भादाखल भंगाळे यांच्या वडिलांचा दाखलाही दाखवला. या दाखल्यावर व्हाईटनर लावण्यात आल्याचेही ते म्हणाले. भंगाळे यांनी खोटी कागदपत्रे दाखल केल्यानेच त्यांची व्हॅलीडीटी आली नसल्याचा दावा बत्रा यांनी करीत नगराध्यक्षांच्या पात्रतेबाबत लवकरच निर्णय येईल, असे सूचक विधानही केले. भाजपा नगरसेवकांच्या आलेल्या व्हॅलीडीटीची कागदपत्रे त्यांनी दाखवली.
मंत्र्यांच्या कुटूंबाची नाहक बदनामी : पिंटू कोठारी
गेल्या 20 वर्षांपासून मंत्री संजय सावकारे हे राजकारणात असून त्यांच्यासह कुटूंबाविरोधात साधी एनसीदेखील दाखल नाही मात्र त्यांची नाहक बदनामी केली जात आहे. गायत्री भंगाळे यांच्याकडे मुळातच प्रमाणपत्र नसल्याने त्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येणार असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले. दरम्यान, नगरसेवक राजेंद्र आवटे, परीक्षीत बर्हाटे आदींनीही भंगाळे यांचे कागदपत्रे बनावट असल्याचा दावा यावेळी केला. यावेळी अॅड.बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, राहुल तायडेंसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

