महाराष्ट्रातील जनता मरणाच्या दारात, उद्धव सरकार मात्र आपल्या घरात…!
माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी आंदोलनात सहभागी होत चर्चेला दिला पूर्णविराम !
मुक्ताईनगर : गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परीषद निवडणुकीत डावलले गेल्याने त्यांनी पक्षावर टिकेची तोफ डागली होती तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्यांना उत्तर दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती तर नाराज असलेले खडसे शुक्रवारी भाजपाच्या आंदोलनात सहभागी होणार नाही ना? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी आंदोलनात सहभागी होत अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
जनता मरणाच्या दारात : कोथळीत झळकले फलक
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे.
सरकार विरोधात शुक्रवारी भाजपातर्फे ठिकठिकाणी पदाधिकार्यांनी आपापल्या घराबाहेर आंदोलन केले. आंगण ते रणांगण अशा शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकत्यांनी आंदोलन छेडले. कोथळी येथे माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी आंदोलन केले. राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उत्पादकांना योग्य तो दर दिला जावा, असे मजकूर असलेले फलक हातात घेवून उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, नारायण चौधरी, योगेश कोलते, उमेश राणे, संदीप देशमुख, आसीफ बागवान व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


