भुसावळातील सत्ताधारी-विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपाऐवजी शहर विकासावर लक्ष केंद्रीत करावे : माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे
नेमाडे उवाच : नागरिकांना आरोपांमध्ये इंटरेस्ट नाही ; मूलभूत समस्या सुटण्याची अपेक्षा
Former Municipal Council President Umesh Nemade भुसावळ (20 एप्रिल 226) : भुसावळातील सत्ताधारी-विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये पत्रपरिषदेच्या माध्यमांतून आरोप-प्रत्यारोप सुरू केले असून नागरिकांना त्यात स्वारस्य नाही मात्र त्याऐवजी विकासासाठी दोन्हीकडील नेत्यांनी एकत्र यावे व शहराच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्रावरून भाजपा नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचा यावेळी नेमाडे यांनी चांगलाच समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले तर नगराध्यक्षांनी अधिकाराचा वापर करून विरोधकांना चांगल्या कामातून उत्तर द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
काय म्हणाले उमेश नेमाडे ?
भुसावळातील सुरभी नगरातील कार्यालयात माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर चौफेर टीका केली. ते म्हणाले की, शहरात सत्ताधारी व विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप चालवले असून त्यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती आता आरोपांवर चर्चा करीत असल्याने तुमच्या या भूमिकेमुळे शहराला वेगळे वळण मिळू पाहत आहे. वास्तविक शहराची बदनामी करणारे जे लोक आहेत त्यांना शहरवासीयांनी विकासकामांसाठी निवडून दिले आहे शिवाय नागरिकांना आरोप-प्रत्यारोपात स्वारस्थ नाही त्याना शहरात विकासकामे हवी आहेत, मूलभूत समस्या सुटणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

नगराध्यक्षा बोलताय ‘तो’ त्यांचा विचार नाही !
माजी नगराध्यक्ष नेमाडे म्हणाले की, तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी शहराला तीन दिवसाआड पाणी देणार होतात मात्र आता प्रत्यक्षात सध्या 10 ते 12 दिवसाआड पाणी मिळत असून त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी केला. अलीकडेच नगराध्यक्षांनी पाण्याबाबत तक्रार केली मात्र नगराध्यक्षांना मोठ्या प्रमाणावर अधिकार असतात व या अधिकाराचा त्यांनी वापर करावा, हवे तर त्यांनी अधिकार्यांचे कान पकडावेत व काम करून घ्यावे व तसे केल्यानंतर विरोधकांच्या आरोपांना एकप्रकारे उत्तर मिळेल, असेही नेमाडे यांनी सांगितले. नगराध्यक्षा भंगाळे जे बोलताय हा खरा तर त्यांचा विचार नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले.
भाजपा नगरसेवकांच्या हुकूमशाहीवर ठेवले बोट
नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून अनावश्यक वाद निर्माण केला जात असून हा विषय संबंधित शासकीय जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. समितीचा निर्णय येण्यापूर्वी विरोधी असलेल्या भाजपा नगरसेवकांनी प्रमाणपत्र सादर केल्यास थेट राजीनामा देण्याची वल्गना केली मात्र हा प्रकार हुकूमशाहीचा असल्याचा नेमाडे यांनी केला. जातप्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत असून ते सादर न झाल्यास कारवाईसाठी समिती आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
पालिकेतील गोंधळाचा ‘इतिहास’
पालिकेच्या सभेत विरोधकांकडून निवेदन घेताना गोंधळ झाल्याचा शहरात इतिहास तयार झाला आहे. खरे तर विरोधकांचे निवेदन घेणे हे नगराध्यक्षांचे कर्तव्य असून त्यानंतर त्यावर काय कारवाई करायची हा अधिकार नगराध्यक्षांचा आहे, असेही नेमाडे यांनी सांगितले. मी नगराध्यक्ष असताना रात्री 12 वाजता माझ्या घरी मोर्चे आले मात्र आपण डगमगलो नाही व विरोधकांना आपण कामातून उत्तर दिले. पालिकेला राज्यासह केंद्राकडून कोट्यवधींचा निधी मिळतो मात्र शहरात सर्वदूर कचरा साचून असल्याने निधीचा अपव्यय होत असल्याचे ते म्हणाले.
नेत्यांनी एकत्र आल्यास विकास निश्चित
शहरात कॅबिनेट मंत्री संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी हे दोन्ही अनुभवी नेते आहेत व त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराला होण्यासाठी नेत्यांनी एकत्र यावे, किमान एकमेकांचा प्रतिनिधी पाठवून समस्या सोडवल्यास शहराचा विकास निश्चित होईल, असा विश्वास नेमाडे यांनी यावेळी व्यक्त केला.


