धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याने वाद : मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले, ठाकरेंच्या भेटीवरही केले भाष्य !
नागपूर (25 एप्रिल 2026) : नागपूरातील एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित एक प्रसंग सांगितल्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घ्यावी लागते, असे त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मध्यरात्री झालेल्या भेटीवरही त्यांनी भाष्य करीत लपून भेटी घेण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना लपून-छपून भेटण्याची गरज नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी गुप्त भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय अर्थ लावले जाऊ लागले होते. या संदर्भातही फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जर भेट घ्यायची असेल तर ती उघडपणे घेता येते, लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत की ते लपवावे लागतील, असे ते म्हणाले. त्यांनी या भेटीच्या चर्चांना पूर्णपणे नकार देत, अशा बातम्या पसरवणार्यांवर कारवाईचा इशाराही दिला.

बागेश्वर धाम यांच्या वक्तव्यावर केले भाष्य
नागपूरातील कार्यक्रमात बागेश्वर धाम यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इतिहासात अशा प्रकारचा कोणताही ठोस दाखला उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात, त्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात, असे ते म्हणाले. रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्येही विविध लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घ्यावी लागते, असे त्यांनी सूचित केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे किंवा जे अधिकृत संदर्भ उपलब्ध आहेत, त्यात अशा घटनेचा उल्लेख नाही त्यामुळे लोककथा आणि इतिहास यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर या वादावर काही प्रमाणात स्पष्टता आली असली, तरी राजकीय वर्तुळात चर्चा अद्याप सुरूच आहे.
