मृत वासरासाठी गायीचा रात्रभर हंबरडा फोडत आर्त हाक ; भुसावळात गोसेवकांकडून अंतिम संस्कार
भुसावळ (30 मे 2026) : कलियुगात माणुसकी हरवली का? असा प्रश्न उपस्थित करणारी हृदयद्रावक घटना भुसावळ शहरातील एका भागात घडली. एका गायीचे नवजात वासरू कुपोषणामुळे दगावल्याने त्या गायीने रात्रभर आपल्या मृत वासराशेजारी थांबून आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गायीने नुकताच एका वासराला जन्म दिला होता मात्र जन्मानंतर काही वेळातच ते वासरू अशक्तपणामुळे मृत झाले. आपल्या लेकराच्या मृत्यूची जाणीव झालेल्या गायीने रात्रभर वासराशेजारी बसून हंबरडा फोडला. सकाळपर्यंत ती जागेवरून हलली नाही. परिसरातील अनेक नागरिकांनी हा प्रकार पाहिला मात्र बहुतांश जण केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले.
मृत वासराशेजारी उभी राहून गाय जणू काही आपल्या लेकराला उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारे होते. काही वेळाने ती रस्त्यावर उभी राहून येणार्या-जाणार्यांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करत होती.
ही बाब लक्षात आल्यानंतर गोभक्त अथर्व पाटील यांनी तत्काळ गोसेवक रोहित महाले यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर गोसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. महाले यांनी आपल्या सहकार्यांना बोलावून गायीची व्यथा कमी करण्यासाठी मृत वासराचा सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला.
गो सेवक अथर्व पाटील, बल्लू धायडे, कुणाल शिंदे आणि वैभव नेहते यांनी हिंदू वैदिक पद्धतीने वासराचा अंतिम संस्कार केला. अंतिम संस्कारानंतर गायीची अस्वस्थता काही प्रमाणात कमी झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
समाजाने अशा वेळी पुढे यावे : गो सेवक रोहित महाले
यावेळी गोसेवकांनी समाजाला आवाहन करताना सांगितले की, गोमाता ही केवळ दूध देणारी जनावरे नसून आपल्या संस्कृतीचा आणि संवेदनांचा महत्त्वाचा भाग आहे. मुक्या प्राण्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी समाजाने पुढे यावे.
या घटनेने अनेकांच्या मनाला चटका लावला असून, मुक्या प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारी जपण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
