आठवडाभरात भाजीपाल्याच्या दरात वाढ ; नागरिकांचे बजेट कोलमडले
मेथी, भेंडी, पालक महागले ; कोथिंबीर 60 रुपयांवर, ग्राहक त्रस्त
भुसावळ (1 जून 2026) : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत अनेक भाज्यांच्या दरात प्रति किलो 20 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर परिणाम होत असून भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे.
सर्व भाज्या महागल्या
भाजी बाजारात मेथी, भेंडी, पालक, कारले, मिरची यांसह अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत.कोथिंबीर 60 रुपये किलोवर पोहोचली असून भाजीपाल्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक गरजेपुरताच भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातून येणार्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला असून बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची संख्या कायम असली तरी खरेदीचे प्रमाण घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अनेक जण बाजारात जायचे असल्यास सकाळी 11 वाजेच्या आत जाऊन खरेदी करतात, तर काही जण संध्याकाळी उन कमी झाल्यावर भाजीपाला खरेदी करतात.
बाजारात जाऊन खरेदीवर भर
शहरातील विविध भागांत हातगाडीवर भाजीपाला विक्री करणार्या विक्रेत्यांकडे बाजारपेठेपेक्षा 10 ते 20 रुपये अधिक दर आकारले जात असल्याने अनेक नागरिक थेट भाजी बाजारात जाऊन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. काही ग्राहक मात्र वेळेअभावी वाढीव दराने हातगाडीवरूनच भाजीपाला खरेदी करताना दिसत आहेत.
असे आहेत सध्याचे दर
मेथी, शेवगा आणि कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भेंडी, चवळी, कारले, पालक यांचे दरही तेजीत आहेत. गेल्या आठवड्यात 60 रुपये किलो दराने विक्री होणारा भाजीपाला आता 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
