बंडखोर खासदार म्हणाले, व्हीप लागू होत नाही ; वेगळ्या गटाची केली मागणी
Rebel MP stated that the whip does not apply ; demanded a separate group मुंबई (18 जून 2026) : ‘ऑपरेशन टायगर’ला शिंदे गटाने पूर्ण केल्याचे वृत्त समोर येत असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीत वेगळ्या गटाची मान्यता देण्याची मागणी केली. बंडखोर खासदारांनी आम्हाला शिवसेना ठाकरे गटाचा व्हीप लागू होत नसल्याचे म्हटले आहे. ठाकरे गटाच्या फुटीर खासदारांनी अनेक महत्त्वाचे दावे या पत्रात केले आहेत. या घडामोडींवर शुक्रवारी ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार ? याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले असून त्यातील तपशील आता समोर आला आहे. लोकसभा अध्यक्षांनी आमच्या विलीनीकरणाच्या निर्णयाला मान्यता दिली असल्याने, आम्हाला आता ठाकरे गटाचा कोणताही व्हीप (पक्षादेश) लागू होत नाही, असा मोठा दावा या खासदारांनी केला आहे.


पत्रात काय आहे म्हटले?
पत्रात बंडखोर खासदारांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेतून वेगळा गट स्थापन करण्यामागचे खापर काँग्रेसवर फोडण्यात आले आहे. ठाकरे गट आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने प्रादेशिक पक्षांना स्वतःमध्ये विलीन करून घेण्याचा प्रचार सुरू केला आहे. ठाकरे गट त्याच वाटेवर चालल्याचे दिसत आहे. आम्हाला काँग्रेसमध्ये जायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका या खासदारांनी घेतली आहे तसेच काँग्रेसविरोध हाच हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गाभा होता आणि ठाकरे गट त्याच विचारांना हरताळ फासत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

