ज्येष्ठांनी भूतकाळात रमण्याऐवजी वर्तमानात जगावे : भुसावळात संध्या भोळे
भुसावळातील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात ‘आरोग्यमय आनंदी जीवना’वर मार्गदर्शन
भुसावळ (20 जून 2026) : शहरातील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाच्या साप्ताहिक व्याख्यानमालेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्यमय आनंदी जीवन’या विषयावर संध्या भोळे यांचे व्याख्यान पार पडले. त्यांनी बदलती जीवनशैली, आरोग्य आणि मानसिक संतुलन याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी भूतकाळात रमण्याऐवजी वर्तमानात जगण्याचा मंत्र आत्मसात करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या अध्यक्षा अलका ढाके होत्या. व्याख्यानाच्या प्रारंभी अष्टभुजा देवीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. राम नाम जप विलास नेहेते यांनी केला, तर विश्वप्रार्थना आणि गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे वाचन गजानन इंगळे यांनी केले. संघाच्या अध्यक्षा अलका ढाके यांनी प्रमुख वक्त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.



पाहुण्यांचा परिचय प्रा. दयाघन राणे यांनी करून दिला. नंतर संध्या भोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल युगातील वाढत्या मोबाइल वापरावर भाष्य करताना त्यांनी ‘डिजिटल डिटॉक्सची संकल्पना समजावून सांगितली. मोबाइलचा अतिरेक, सतत नकारात्मक बातम्यांच्या संपर्कात राहणे आणि आभासी जगात अडकून पडणे याचे दुष्परिणाम त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. काही काळ मोबाइलपासून दूर राहणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, सकारात्मक विचार जोपासणे आणि संत साहित्याचा अभ्यास करणे यामुळे मन प्रसन्न राहते, असे त्या म्हणाल्या.
आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक जीवनशैली, बदललेले आहार-विहार आणि वाढता ताणतणाव यांचा शरीर व मनावर होणारा परिणाम स्पष्ट केला. निरोगी जीवनासाठी सुंदर विचार, चांगले आचार, सत्कर्म, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ध्यानधारणा आणि प्रार्थना यांचे महत्त्व अधोरेखित केले. दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रभारी सचिव अशोक निकम, आभार विलास बेंद्रे यांनी मानले. गजानन ठाकूर, विकास टोपरे, ज्ञानेश्वर गव्हाळे, सुरेश भामरे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सभासदांनी परिश्रम घेतले. चंद्रकांत भारंबे यांनी पसायदान म्हटले.
यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. संतांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी आनंदी जीवनाचे सूत्र उलगडून सांगितले. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारणे, ऐहिक सुखापेक्षा मानसिक समाधानाला प्राधान्य देणे आणि वर्तमानात जगण्याची वृत्ती अंगीकारणे हेच खर्या आनंदाचे रहस्य असल्याचे सांगितले. आपल्या प्रेरणादायी व्याख्यानाचा समारोप त्यांनी कवितेद्वारे केला.

