एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अदनान अलींच्या सेवेची दमदार सुरुवात


जळगाव (26 जून 2026) : नुकतेच रूजू झालेले हृदयविकार तज्ञ डॉ.अदनान अलीांच्या सेवेची दमदार यशस्वी सुरूवात झाली आहे. विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या चार रुग्णांवर एकाच दिवशी यशस्वी एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयालयाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली. अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ डॉ.अदनान अली व त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या प्रयत्नांमुळे चारही रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर व समाधानकारक आहे.

चौघांवर एकाच दिवशी शस्त्रक्रिया
हृदयविकाराशी संबंधित विविध तक्रारी घेऊन चार रुग्ण उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. काही रुग्णांना छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, चालताना दम लागणे आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जाणवत होती. रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने हृदयालयात दाखल करण्यात आले.



चारही रुग्णांवर यशस्वी एन्जिओप्लास्टी
हृदयालयाचे प्रमुख डॉ.वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. त्यानंतर एन्जिओग्राफीसह आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमधून चारही रुग्णांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या कोरोनरी धमन्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अडथळे असल्याचे निदर्शनास आले. या अडथळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला होता.रुग्णांची स्थिती आणि तपासणी अहवालांचा अभ्यास केल्यानंतर तातडीने एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदयालयातील अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांच्या समन्वयातून चारही रुग्णांवर यशस्वी एन्जिओप्लास्टी करण्यात आली.

उपचारांना प्रतिसाद
या प्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या किंवा अरुंद झालेल्या धमन्यांमध्ये स्टेंट बसवून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर चारही रुग्णांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ल्यासह पुढील उपचार देण्यात येत आहेत.

हृदयविकाराची लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला
अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि वेळेवर उपलब्ध होणारे उपचार यामुळे परिसरातील हृदयरुग्णांसाठी हे हृदयालय आशेचा किरण ठरत आहे. हृदयविकाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा जाणवणे याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास गंभीर धोके टाळता येतात, असे डॉ.अदनान अली म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !