जळगावातील ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज शोकसभा
विनामूल्य आरोग्य शिबिराचेही आयोजन : स्मृतींना मिळणार उजाळा
जळगाव (30 जून 2026) : बालरंगभूमीवर आपले संपूर्ण आयुष्य जगणारे, आपल्या अष्टपैलू कलेने असंख्य बालकलावंत घडविणारे आणि बालप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जळगावचे लाडके नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांचे नुकतेच दीर्घकालीन आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीची आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवार, 30 रोजी जळगावात व.वा.वाचलनालयाच्या रामनारायण सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता ’शोकसभा’ होत आहे.
नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
शोकसभेस दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहण्यासाठी व त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व समस्त जळगावकर नाट्यकर्मींतर्फे करण्यात आले आहे.


स्मृतीप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य शिबिर
स्व.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या करण्यात येतील.
हे शिबिर मंगळवारी आठ ते दहा दरम्यान अरुश्री हॉस्पिटल, तळमजला, महेश प्रगती हॉलजवळ, रिंगरोड, जळगाव येथे होत आहे.
हे आरोग्य तपासणी शिबिर सर्व नाट्यकलावंत व त्यांच्या कुटुंबियांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व नाट्यकलावंत, रसिक आणि नागरिकांनी या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव, अरुश्री हॉस्पिटल व मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
