साकळीकरांनी पिण्याचे पाणी काटकसरीने व जपून वापरा : सरपंच दीपक पाटील यांचे आवाहन


यावल (3 जुलै 2026) : यावल एल निनोच्या भयावह नैसर्गिक संकटामुळे मोसमी पावसावर मोठा परिणाम झाला आहे. अद्यापपर्यंत आपल्या गाव परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने सर्वत्र जमिनीतील पाणी कमी होत असल्याने या गंभीर परिस्थितीमुळे आपल्या भागातील जमिनीतील पाण्याची पातळी काळजीची बनली आहे. एकूण समोर आलेले चित्र पाहता आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे साकळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांनी केले आहे.

मुबलक पाणी मात्र साठा जपून वापरणे गरजेचे
सरपंच दीपक पाटील म्हणाले की,साकळी गावासाठी गाव परिसरात पाण्याचे चांगले स्रोत आहेत. यातून आपल्याला भरपूर पाणी मिळत असते. या मिळणार्‍या मुबलक पाण्यामुळे आपल्या गावाला गेल्या उन्हाळ्यात तांत्रिक अडचण वगळता गावात कुठेही पाणीटंचाई जाणवली नाही. काही किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठ्याचा एक दिवस मागेपुढे झाला असेल मात्र दोन ते तीन दिवसाआड गावातील प्रत्येक भागात नियोजनाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा पुरेसे सज्ज होते.

पाणीपुरवठा कर्मचारी यांनी सुद्धा आपले काम अतिशय चोखपणे बजावले. हे माझे व माझ्या सहकार्‍यांचे तसेच संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचे मोठे यश आहे. दरम्यान यंदाच्या जून महिन्यातच हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे प्रशांत महासागरात खूप मोठ्या प्रमाणात ’एल निनो ’ निर्माण झाल्याने मोसमी पावसावर मोठा परिणाम होऊन जून महिन्यात आपल्या तालुक्यात कोठेही पावसास सुरुवात नव्हती.

आपला गाव परिसरही मोसमी पावसाअभावी कोरडा गेला. या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीने जून महिन्यातही उन्हाचा कडाका कायम राहिला. दुष्काळसदृश्य परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी ‘पाणीबाणी’ होऊ शकते. पाऊस नसल्याने आपल्या गाव परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या जलस्रोतांच्या ठिकाणी सुद्धा पाणी पातळी खोल जाऊ लागली लागल्याचा अंदाज आहे मात्र ग्रामस्थांनी घाबरून न जाता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !