सात हजारांची लाच भोवली : चाळीसगावातील उपविभागीय अभियंत्यासह दोघे धुळे एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
₹7,000 Bribe Lands Two in Trouble: Chalisgaon Sub-Divisional Engineer and Another Caught in Dhule ACB Net चाळीसगाव (7 जुलै 2026) : रस्ता कामाचे बिल काढून ते पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगावातील वर्ग एकचा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे व जि.प.चा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कुलदीप गमे यांना धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हा सार्वजनिक बांधकामाशी संबंधित कंत्राटदार आहे. त्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गाव हाळचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे मोजमाप होवून मोजमाप पुस्तिकेत नोंदी व मूल्यांकन होवून एकूण 10 लाख 47 हजार 843 रुपयांचे बिल अदा करण्यासाठी व अभियंता निनावे यांच्याकडे पाठवण्यात आले होते. तक्रारदाराने बिलासाठी निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकूण बिलाच्या एक टक्केप्रमाणे 10 हजार 500 रुपयांची लाच मागितली व धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात निनावे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सात हजारात तडजोड केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला.

दोन्ही आरोपींना अटक
चाळीसगावातील जि.प.चा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कुलदीप गमे याने कार्यालयातच सात हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्याच्यासह
जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे यास अटक करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
एसीबीचे नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा.