यावल शहरातील वाणी गल्लीतील गटारीची भीषण समस्या
यावल (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : यावल शहरातील वाणी गल्लीत गटारीची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या परिसरात गटारीचा प्रश्न कायम आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना रोजच अस्वच्छ वातावरणात वावरावे लागत आहे. याशिवाय रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
वाहन चालकांसह पादचार्यांची कसरत
पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात अपघाताचा धोका अधिक वाढतो. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ताप, डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. यावलकर नागरिक वारंवार आजारी पडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.



प्रशासनाकडे तक्रारीनंतर दखल नाहीच
नागरिकांचे म्हणणे आहे की, या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाणी गल्लीतील नागरिकांची प्रशासनाला विनंती आहे की, या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन गटारींची साफसफाई व दुरुस्ती करावी, रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, तसेच डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित फवारणी करून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वाणी गल्लीतील नागरीकांनी केली आहे.