स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसावळात देशभक्तांतर्फे भव्य तिरंगा रॅली
भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : एक तिरंगा, एक भारत, एक भावना ही देशभक्तीची भावना मनामनात जागृत करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भुसावळ शहर व तालुक्यातील देशभक्त नागरिकांच्या वतीने शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भुसावळ शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशभक्तीपर घोषणांनी भुसावळ दुमदुमले
भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदविला. संपूर्ण मार्गावर देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.




51 फुटी तिरंग्याने वेधले सर्वांचे लक्ष
शहरातील अष्टभुजा देवी मंदिरापासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नाहाटा महाविद्यालय चौफुलीवरील शहीद राकेश शिंदे स्मारकाजवळ पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला तब्बल 51 फूट लांबीचा भव्य तिरंगा. तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनीही रॅलीचे स्वागत केले.
या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, देशाच्या अखंडतेचे महत्त्व आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. विविध जाती, धर्म, पक्ष व सामाजिक स्तरातील नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
या तिरंगा रॅलीमध्ये प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ. संगीता बियाणी, भाजपचे शहराध्यक्ष किरण कोलते, संदीप सुरवाडे, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बर्हाटे, गिरीष महाजन, कविता कोठारी, ड. बोधराज चौधरी, स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पदाधिकारी संभाजीनगरच्या विराट रॅलीसाठी रवाना
दरम्यान, भाजपतर्फे संभाजीनगर येथे शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या विराट तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाले. शहरातील प्रत्येक प्रभागातून नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतला.
शहरात सर्वत्र राष्ट्रभक्तीचे वातावरण
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भुसावळात एकाच वेळी विविध ठिकाणी उमटलेला तिरंग्याचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शहरात सर्वत्र राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. तिरंगा हा केवळ ध्वज नसून तो देशाची शान, स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक आहे, या भावनेने नागरिकांनी रॅलीत सहभाग घेत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.