रांगोळीतून विद्यार्थ्यांनी मांडले विकसीत भारताचे स्वप्न : यावल कनिष्ठ विद्यालयात रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


यावल (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित तिरंगी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल 32 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलात्मक प्रतिभेतून विकसित भारतासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली.

विद्यार्थ्यांनी करून दिली सामाजिक जाणीव
या रांगोळी स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ कलात्मक रांगोळ्या न काढता विकसित भारताच्या वाटचालीसाठी आवश्यक असलेले प्रश्न, सामाजिक समस्या, पर्यावरण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध विषयांना कलात्मक माध्यमातून समाजासमोर मांडले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसोबतच त्यांची सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीची भूमिका या स्पर्धेतून अधोरेखित झाली.





यांची होती उपस्थिती
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर प्रमुख अतिथी होत्या. गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, शाळेचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर, एन.डी.भारुडे, बी.पी.वैद्य, एस.बी.चंदनकार, दीपक जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

योग्य व्यासपीठ मिळाल्यास व्यक्तीमत्वाचा विकास : तहसीलदार
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात. त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले. रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी व ज्वलंत सामाजिक प्रश्न आपल्या कल्पकतेतून मांडले, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

रांगोळी कला नसून विचार व्यक्त करण्याचे माध्यम
गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून, रांगोळी ही केवळ एक कला नसून विचार आणि भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी ही कला जोपासावी, असे आवाहन केले.

मुख्याध्यापक ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
एम.एम.गाजरे, नीलिमा पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार नीता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

रांगोळी स्पर्धेतील विजेते असे
प्रथम- मानव पंकज चौधरी (इयत्ता 9 वी), द्वितीय- टिनिया प्रसेनजीत कोलते (इयत्ता 10 वी), तृतीय- हर्षदा सुरेश न्हावी (इयत्ता 9 वी), उत्तेजनार्थ- लावण्या योगेश पाटील (इयत्ता नववी). या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तहसीलदार नाझीरकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या कलात्मक सादरीकरणाचे कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !