विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले ; आपला निर्णय कायद्याच्या चौकटीतच !
मुंबई (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : मी जो काही निर्णय दिला आहे, तो अत्यंत शाश्वत आणि पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकषांचे पालन करूनच तो निर्णय घेण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले नार्वेकर ?
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर ‘मूळ पक्ष व धनुष्यबाण चिन्ह’ यावर सुरू असलेला कायदेशीर लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बहुमताच्या आधारावर शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथे ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘युक्तिवाद म्हणजे अंतिम निर्णय नव्हे’
ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणार्या युक्तिवादावर भाष्य करताना नार्वेकर म्हणाले की, जे लोक निवडणूक आयोग किंवा माझ्या निर्णयाशी सहमत नाहीत, त्यांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आणि तिथे युक्तिवाद करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, कोर्टात केवळ एका बाजूने युक्तिवाद झाला म्हणजे तोच कोर्टाचा अंतिम निकाल ठरत नाही. आता एका बाजूने युक्तिवाद झाला आहे, लवकरच दुसरी बाजूही आपले म्हणणे मांडेल. त्यानंतर सर्व तथ्ये आणि परिस्थिती तपासूनच सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निर्णय देईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विश्वास
या कायदेशीर लढ्याबाबत बोलताना नार्वेकर पुढे म्हणाले की, विधीमंडळ सचिवालयाने या संपूर्ण प्रक्रियेत जे काही कामकाज केले आहे, त्याची सर्व सविस्तर माहिती आणि कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाकडे आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर येणार्या काळात न्यायालय यावर योग्य आणि कायदेशीर निर्णय देईल, याची मला निश्चित खात्री आहे.


