15 जूनपासून जळगाव कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त चुकीचे
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
जळगाव : 15 ते 30 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून हे वृत्त निखालस खोटे व चुकीचे आहे. या जिल्हा प्रशासनाच्यावतीने अद्याप असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नय, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
त्या वृत्तात तथ्य नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सोशल मिडीयावर व्हायरल वृत्तात नागरीकांनी महत्त्वाचे सामान व पेट्रोल भरणे त्याचबरोबर जिल्ह्यात सीआरपीएफ आणि मिलिटरीचे जवान बोलविण्यात येणार असल्याचीही अफवा पसरविण्यात येत आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही त्यामुळे नागरीकांनी वस्तुंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये तसेच जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी केले आहे.


खोट्या अफवा पसरवणार्यांवर दाखल होणार गुन्हे
त्याचबरोबर नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल अशा खोट्या अफवा व संदेश कोणीही पसरवू नये. जे कोणी असे खोटे मेसेज पसरवून नागरीकांमध्ये भीती निर्माण करतील. त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला आहे.
