कृत्रिम बुद्धिमत्तेवरील नाटीकेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दीपनगरात तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव उत्साहात


भुसावळ (रविवार, 6 सप्टेंबर 2026) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे तसेच वैज्ञानिक संकल्पना नाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव येथील श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, दीपनगर येथे 4 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक विषयावर सादर करण्यात आलेल्या नाटिकेने विशेष प्रभाव पाडत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मानांकन मिळविले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखडे, बीआरसीचे विषयतज्ज्ञ संजय गायकवाड, सचिन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य जे.बी.पाटील, पर्यवेक्षक गणेश सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक नाटीका सादर केल्या. विद्यार्थ्यांनी अभिनय, संवादफेक, रंगमंचीय सादरीकरण आणि वैज्ञानिक आशय यांचा प्रभावी मेळ साधत विविध वैज्ञानिक संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडल्या. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक व तंत्रज्ञानाधारित विषयाची नाट्यमय मांडणी करताना विद्यार्थ्यांनी दाखविलेली सर्जनशीलता आणि प्रभावी सादरीकरण लक्षवेधी ठरले.

नाट्यातील सादरीकरणाबाबत मार्गदर्शन
स्पर्धेचे परीक्षण अलका भटकर, सोनाली वास्कर यांनी केले. त्यांनी नाटीकांचे परीक्षण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना नाट्य सादरीकरणातील विविध बारकाव्यांबाबत मार्गदर्शन केले. विषयाची योग्य निवड, वैज्ञानिक आशयाची अचूकता, परिणामकारक मांडणी, संवादफेक, अभिनय, रंगमंचावरील हालचाली, वेळेचे भान तसेच संदेश प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे या बाबी नाटिकेच्या यशासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे परीक्षकांनी स्पष्ट केले.

अंगभूत गुणांचा करावा विकास
प्राचार्य जे.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना जीवनाची दिशा निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत गुणांचा विविध क्षेत्रांत विकास करावा, असे आवाहन केले. जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता जोपासण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका नीलिमा पाटील तर रुपाली राणे यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !