महिला ग्राम महसूल अधिकार्याची धडाकेबाज कारवाई : अवैध वाळू वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर जप्त
रावेर (शुक्रवार, 24 सप्टेंबर 2026) : रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई सुरू केल्याने अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले आहेत. विवरे खुर्द येथील महिला ग्राम महसूल अधिकारी दीपाली मुकुंदा बुंदेले यांनी कोतवाल ध्रुवकुमार जिरीमाळी यांच्या सहकार्याने अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले.
वाढत्या तक्रारीअंती कारवाई
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकार्यांना अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विवरे खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी दीपाली मुकुंदा बुंदेले व कोतवाल ध्रुवकुमार जिरीमाळी यांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.




