वाघझिर्यातील आदिवासी शेतकर्यांच्या वनपट्ट्यातील तूर कापून नुकसान
यावल (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील वाघझिरा या गावातील रहिवासी एका आदिवासी शेतकर्याच्या सातपुड्याच्या कुशीत मिळालेल्या वनपट्ट्यातील तुरीचे अज्ञात माथेफिरूने नुकसान केले. शेतकर्याचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
यावल पोलिसात तक्रार
वाघझिरा गावातील रहिवासी व आदिवासी शेतकरी इड्या पुड्या बारेला यांना सातपुड्याच्या कुशीत वन अधिकार कायद्यान्वये वनपट्टा मिळालेला आहे. त्यांना मिळालेल्या वनपट्ट्यातील शेतीत त्यांनी यंदा खरीप हंगामात तूर पिकाची लागवड केली. पीक हे चांगल्यापैकी वाढले होते आणि आता उत्पन्न येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान कुणीतरी अज्ञात माथेफिरूने त्यांच्या या वनक्षेत्रातील शेतात जाऊन संपूर्ण तुरचे पीक हे कापून टाकले यामध्ये या शेतकर्याचे सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात शेतकर्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली.