शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई : राज्यात प्रतिबंधित 19 लाखांचा सुगंधित पानमसाल्यासह तंबाखूचा साठा जप्त

मध्यप्रदेशच्या चालकाला अटक : वाहनासह तब्बल 29 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


शिरपूर (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, गुटखा, तंबाखू व सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूसह आयशर वाहन मिळून एकूण 29 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हाडाखेड येथे वाहन तपासणी सुरू केली. यावेळी एम.पी.07 जी.बी.1618 क्रमांकाचे चारचाकी वाहन आल्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी वाहन चालक संजयकुमार किशोरीलाल गुप्ता (55, रा. रोटी फाटक, लोहामंडी, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले.

29 लाखांचा मुद्देमाल जप्त
आयशर वाहनातून राजश्री पान मसाला, केपी डबल ब्लॅक तंबाखूचा 19 लाख 19 हजारांचा साठा तर 10 लाखांचे आयशर मिळून एकूण 29 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी शशिकांत भरत राणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, उपनिरीक्षक मिलिंद पवार, अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, सुनील पवार आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !