भुसावळातील तरुणाचे खून प्रकरण : संशयीत आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी


भुसावळ (रविवार, 27 सप्टेंबर 2026) : अश्लील शिविगाळ केल्याच्या रागातून शहरातील जुन्या नगरपालिकेतील एका खोलीत राहुल सदाशिव धांडे (35, कवठा, ता.अकोट, जि.अकोला) या तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला होता. ही धक्कादायक घटना श्री विसर्जनाच्या दिवशी अर्थात मंगळवार, 25 रोजी रात्री उशिरा घडली होती. खूनानंतर संशयीत पवन अनिल सोनवणे (30, वरणगाव) हा वरणगाव पोलिसात हजर झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

काय घडले भुसावळात ?
सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत पवन व राहुल दोघे मित्र असून श्री विसर्जनाच्या दिवशी दोघेही शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशनच्या अलीकडे दारू प्यायले व रात्री दोघेही जुन्या नगरपालिकेतील विहिरीसमोरील एका खोलीत बसले असताना राहुलने पवनला अश्लील शिविगाळ केल्याने उभयंतांमध्ये वाद पेटला. संतापाच्या भरात आरोपी पवनने राहुलला जमिनीवर जोरात आपटले तसेच त्याचा रूमालाने गळा आवळून खून केला. खुनानंतर संशयीत पसार होवून वरणगावात पोहोचला व त्याने वरणगाव पोलिसांकडे सरेंडर होत खुनाची माहिती दिली.

आरोपीला एका दिवसाची कोठडी
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.

बंद पालिका गुन्हेगारांसाठी ठरतेय कुरण !
शहरातील बसस्थानकाजवळील पालिकेची ईमारत जीर्ण झाल्याने गोपाळ नगरात सध्या पालिका हलवण्यात आली मात्र जुन्या जागेवरील जीर्ण इमारतीत अद्यापही काही खोल्या गुन्हेगारांसाठी कुरण ठरत आहे. यापूर्वीदेखील या भागात गुन्हेगारांचा नेहमीच वावर राहिला असल्याने आता खुनाच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने पूर्णपणे पालिकेची इमारत पाडावी तसेच पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तींना लगाम लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !