धुळ्यात दुकानाच्या गाळ्यावरून वादानंतर गोळीबार : दोन आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; आरोपींकडून गावठी कट्टा जप्त : आठ संशयीतांविरोधात गुन्हा


धुळे (सोमवार, 28 सप्टेंबर 2026) : शहरातील मनोहर टॉकीजजवळ दुकानाचा गाळा घेण्याच्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत चायनीज दुकानातील विक्रेत्याला मारहाण करीत गोळीबार केला होता. या थरारक घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे शहर पोलिसात या प्रकरणी आठ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

वैभव उर्फ गोलू संजय मेकले (24, रा.अमरनगर, मनोहर टॉकीज मागे, धुळे) व भूपेश उर्फ भूषण तिलकसिंग लोधी (23, रा.अमरनगर, मनोहर टॉकीज मागे, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडून देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

काय घडले धुळ्यात ?
शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या मनोहर टॉकीजजवळील नाटेश्वर ईलेक्ट्रीसमोरील चायनीज विक्रेता व तक्रारदार हर्षल दीपक गवळी व त्याच्या भावावर दुकानाचा गाळा घेण्याच्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आदींनी धाव घेतली होती. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.

आठ आरोपींविरोधात गुन्हा
भरदिवसा झालेल्या गोळीबार व हाणामारीप्रकरणी वैभव उर्फ गोलू संजय मेकले (24), भावेश कौलस्कर, ऋषिकेश मोरे, भूषण लोधी, नकुल रगडे, विवेक गवळी, प्रथमेश भोंडवे, पंकज मेकले (सर्व रा. धुळे) यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान गुन्हे शाखेने वैभव मेकले व भूपेश लोधीला अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यातील कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. अटकेतील आरोपी वैभव ऊर्फ गोलू संजय मेकलेविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून संशयीत भावेश अनिल कौलस्कर (22, रा.ग.नं. 5/6 ची बोळ, माधवपुरा, धुळे) याच्याविरुद्धही आझादनगर पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ, मायुस सोनवणे, दिनेश परदेशी, शिरीष भदाणे, राहुल सानप, आरीफ पठाण, धर्मेंद्र मोहिते, नरेंद्र गिरासे, सचिन गोमसाळे, सुशील शेंडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !