चारधाम यात्रेस निघालेल्या किनगावच्या भाविकाचा मृत्यू
यावल (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भाविक, भक्तांचा एक जत्था चारधाम यात्रेसाठी गुरुवारी निघाला असताना पथकातील 64 वर्षीय वृद्धाचा यमुनोत्रीला सोमवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. दर्शन घेऊन परत येत असतांना ही घटना घडली. मृतावर बुधवार, 30 सप्टेंबर रोजी उत्तराखंडातील हरिद्वार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दगडू ओंकार पाटील (64) असे मृत भाविकाचे नाव आहे.
चारधाम यात्रेत हृदयविकाराने निधन
किनगाव बुद्रुक गावातील रहिवासी दगडू ओंकार पाटील (64) हे त्यांच्या पत्नी विठाबाई पाटील व किनगाव गावातील सुमारे 22 जणांच्या जत्थ्यासोबत गुरुवार, 24 सप्टेंबरला चारधाम यात्रेसाठी निघाले होते. 26 सप्टेंबर रोजी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे पोहोचल्यानंतर तेथून भाविकांनी विविध ठिकाणी दर्शन घेत 28 सप्टेंबरला यमुनोत्री येथे दर्शनासाठी निघाल्यानंतर दर्शनाहून भाविक परतल्यानंतर परतीच्या मार्गादरम्यान दगडू पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सहकारी भाविकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना देण्यात आली. त्यांच्यावर हरिव्दार तीर्थक्षेत्रावर अंत्यसंस्कार केले जावे, असा निर्णय कुटुंबाने घेतला. बुधवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हरिव्दार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांची मुले उत्तराखंडला रवाना झाली असून मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुलगा नेदरलँडहून थेट रामेश्वरला दाखल
दगडू ओंकार पाटील यांचा मोठा मुलगा किरण पाटील हा नेदरलँडला वास्तव्यास आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच तो लंडनमार्गे दिल्लीला रात्री दाखल झाला असून बुधवारी तो त्याची पत्नी त्याची दोन मुले हरिव्दार येथे दाखल झाल्यानंतर अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांचा लहान मुलगा चेतन पाटील हा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नगर रचना विभागात प्रशासकिय अधिकारी असून तोदेखील सहकुटुंब हरिव्दारला रवाना झाला आहे.
