भुसावळच्या आठवडे बाजार परिसरात रस्त्यांवर अतिक्रमण

वाहतुकीचा खोळंबा, दुकानांतील माल थेट रस्त्यावर ; पोलीस प्रशासनाकडून हवी कारवाई ः कस्तुरी पॅलेस ते प्रकाश सायकल मार्टदरम्यान तसेच संगतानी कॉम्प्लेक्स परिसरात नागरिकांची गैरसोय


भुसावळ (मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील आठवडे बाजार परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात येणार्‍या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनधारकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कस्तुरी पॅलेस ते प्रकाश सायकल मार्टदरम्यान तसेच संगतानी कॉम्प्लेक्स आणि शाळा क्रमांक 5 जवळ काही दुकानदारांकडून दुकानांतील माल रस्त्यावर मांडला जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दररोज होतेय वाहतूक कोंडी
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित परिसरात दुकानांबाहेरील रस्त्याच्या सुमारे 15 फूट जागेवर माल मांडून अतिक्रमण केले जात आहे. ही परिस्थिती केवळ आठवडी बाजाराच्या दिवशीच नव्हे, तर वर्षभर दररोज कायम असल्याचा आरोप असून वाहन चालकांसह पादचार्‍यांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.









विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शाळा क्रमांक पाच जवळील परिसरात रस्त्यावर माल मांडला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गर्दीच्या वेळी वाहनांची वर्दळ आणि रस्त्यावरील अडथळे यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील रहिवासी आणि व्यापार्‍यांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेकडे कारवाईची मागणी
सार्वजनिक रस्ते हे सर्व नागरिकांच्या वापरासाठी असताना त्यांचा व्यावसायीक कारणांसाठी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वापर केला जाणे योग्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे भुसावळ नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे संबंधित परिसराची पाहणी करून अतिक्रमणाची खातरजमा करावी आणि नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

केवळ एक-दोन दिवसांपुरती कारवाई न करता रस्त्यावरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित देखरेख आणि आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार : सहा.निरीक्षक राहुल भंडारे
सणा-सुदीचा काळ असून व्यापार्‍यांनी रस्त्यांवर आपले साहित्य आणू नये व वाहतूक कोंडी निर्माण करू नये. वाहतूक शाखेकडून बाजारपेठेत नियमित गस्त वाढवण्यात आली असून रस्त्यांवर अडथळा वा वाहतूक खोळंबल्यास संबंधितावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असे सहा.निरीक्षक राहुल भंडारे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !