धुळ्यासह अमळनेरातून तीन दुचाकींची चोरी : मुकटीतील आरोपी जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
धुळे (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : धुळे शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत मुकटीतील दोन आरोनींना अटक केली. आरोपींकडून चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आली. आरोपींनी धुळ्यासह अमळनेर शहर हद्दीतील दुचाकी चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे तर अन्य एका दुचाकीबाबत खातरजमा सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपी जाळ्यात
धुळे शहरातील हिरे मेडिकल कॉलेज परिसरातील अपघात वॉर्डसमोरील मोकळ्या जागेतून 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान केशव रमेश मोरे (अवधान, जि.धुळे) यांची दुचाकी (एम.एच.18 बी.क्यू.5398) चोरीला गेली होती. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेतले.
या आरोपींना अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिकेत प्रशांत पाटील (20, रा.रुनमळी, ता.साक्री, जि.धुळे), मयूर धनराज पाटील (20, रा.मुकटी, ता.धुळे) यांना धुळ्यातील देवपूर भागातील एकवीरा अमरधाम समोरील नदीकिनारी भागातून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी चौकशीत या गुन्ह्यात स्वागत मल्हारी वाघ (छावडी, ता.साक्री) याचाही सहभागी असल्याची कबुली दिली. आरोपींच्या चौकशीत त्यांनी धुळे शहर हद्दीतून चोरी केलेली 20 हजार रुपये किंमतीची शाईन तसेच अमळनेर हद्दीतील 30 हजार रुपये किंमतीची व्हेस्पा तसेच 25 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर काढून दिली. या दुचाकीबाबत इंजिन व चेचीस क्रमांकावरून तपास केला जात आहे. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत 75 हजार रुपये आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, अंमलदार राहुल सानप, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, आरीफखा पठाण, शिरीष भदाणे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने केली.
