कोरोनाच्या काळातही जवाबदारी अधिकार्यांची कार्यालयात गैरहजेरी
रावेर : कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जग त्रस्त असलेतरी ग्रामीण भागातूनही विविध कामे घेवून शहरात येत असलेल्या नागरीकांना शासकीय कार्यालयात जवाबदार अधिकारी भेटत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असलीतरी खाजगी वाहनाद्वारे नागरीक खाजगी व शासकीय कामांसाठी शहरात येत असलेतरी अधिकारी सापडत नसल्याने या नागरीकांचा मोठा हिरमोड होत आहे. कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी कार्यालयात कर्मचार्यांची संख्या कमी असावी, असे शासनाचे आदेश असलेतरी महत्वाच्या दिवशीदेखील कार्यालयात जबाबदार अधिकारी गायब असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
जबाबदार अधिकारी असतात गायब
रावेर शहरातील काही शासकीय कार्यालयात फेर-फटका मारला असता यावेळी जलसंधारण विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील दोन्ही विभाग, सर्व शिक्षा अभियान, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, फळ उत्पादन विभाग, सिटी सर्वे विभाग, वन विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय, पंचायत समिती विभागाचे जबाबदार अधिकारी गायब असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला आढळले.
यांची होती कार्यालयात उपस्थिती
महसूल विभागात तहसीलदार उषाराणी देवगुणे, जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे चंद्रशेखर चोपडेकर, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.एन.डी.महाजन, सामाजिक वनीकरणाचे अर्शद मुलानी, कृषी उपन्न बाजार समितीचे गोपाळ महाजन तर खरेदी-विक्री संघात विनोद चौधरी हे शुक्रवारी कार्यालयात बसून कोरोना काळात जनतेची कामे करताना दिसून आले.

