यावलमधील रस्ता रोको प्रकरणी भाजपा पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा


यावल : दुध दर मागणीसाठी शनिवारी भाजपा पदाधिकार्‍यांनी केलेल्या रस्ता रोको प्रकरणी भाजपाच्या सुमारे 25 कार्यकर्त्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ टी पॉईंटवर भाजपा पदाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता रस्ता रोको करीत वाहने अडवून शासन विरोधात घोषणाबाजी केली होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे उल्लंघण केल्याचा ठपका पदाधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे.

यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
कॉन्स्टेबल सुशील रामदास घुगे यांच्या फिर्यादीनुसार डॉ.निलेश सुरेश गडे, रवींद्र सूर्यभान पाटील, पुरोजीत गणेश चौधरी, अतुल वसंतराव पाटील, पल्लवी पुरोजित चौधरी, उमेश फेगडे, दीपक पाटील, हेमराज ऊर्फ बाळू फेगडे, मुबारक तडवी, हर्षल पाटील, साहील तडवी यांच्यासह अन्य 10 ते 12 पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेशान्वये पो.हे.कॉ. नितीन चव्हाण हे करीत आहे. यामुळे संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

हा तर भाजपाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- अतुल पाटील
भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावल येथील भुसावळ टी पॉईंटवर दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे व अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुरू असताना तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी स्वतःहून आंदोलनाला सामोरे जात निवेदन स्वीकारले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्स पाळून व तोंडाला मास्क बांधून शांततामयरीत्या आंदोलन केले होते. असे असताना मात्र रात्री उशिराने पोलिस प्रशासनाने कोविड नियमांचे उल्लंघण झाल्याचे कारण देत आमच्यावर गुन्हे दाखल केले. वास्तविक पाहता असेच आंदोलन यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांनी देखील गेल्याच आठवड्यात केले होते मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या आघाडी सरकार विरोधात केले असल्याने शासनाने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी गुन्हे दाखल केले आहेत. शासनाकडून भाजपचा बुलंद आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे असे असले तरी जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी बांधील असून असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी महाराष्ट्र सरकारची मनमानी सहन करणार नाही. आंदोलक विरोधी पक्ष भाजपला वेगळा न्याय व सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला वेगळा न्याय ही प्रशासनाची भूमिका यातून स्पष्ट होत असल्याचे मत यावलचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !