खर्या मित्रांची संकटकाळीच होते ओळख !
भुसावळ : जगात सर्वाधिक विश्वासाचे कुठले नाते असेल तर ते मैत्रीचे कारण इतर नाती व संबंध ठरविण्याचा मानवास फारसा वाव नसतो . बरीचशी नाती तर आपसूकच
रक्ताची नाती म्हणून चिकटलेली असतात. परंतु मैत्रीच्या नात्यांमध्ये मात्र विश्वास व समगुण हे मुख्य आधारस्तंभ असतात. ऋीळशपव ळप पशशव ळी र षीळशपव ळपवशशव इंग्रजीतील या सुप्रसिद्ध वाक्याप्रमाणे मित्राची खरी ओळख मात्र संकटकाळी होत असते तसं बघायचं झाल्यास आताचा कोरोना संक्रमणाचा काळ हा बहुतांश लोकांच्या आयुष्यातील आव्हानात्मक काळ आहे .त्यामुळे ही मित्रांच्या परीक्षाच म्हणता येईल.
आचरणातून घडवावा आदर्श
मैत्री म्हटलं म्हणजे मौजमजा ,गप्पाटप्पा ,एकमेकांना भेटून जोरात मिठी मारणे ,सोबत फिरायला जाणे, एकमेकांच्या घरी तास न तास गप्पांसोबतच चहा-नाश्ता -जेवण या सर्व गोष्टी आपसूकच आल्या परंतु या कोरोना काळात हे शक्य नाही. किंबहूना शक्य असले तरी जी व्यक्ती या गोष्टी जाणीवपूर्वक टाळेल तोच तुमचा खरा मित्र. कारण वैद्यकीय तज्ञ एकीकडे या गोष्टी टाळायला सांगत आहेत परंतु काहींना मात्र या जाचक अटी वाटत आहेत. त्यामुळे आज प्रत्येकाचे कर्तव्य आहे की या गोष्टी प्रकर्षाने टाळून आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील समजवावे कारण बरेच जण असे आहेत की जे आपले आई-वडील ,वडीलधारी मंडळी ,शिक्षक -गुरुजन इतकेच काय घरचे लहान मुले यांचेही मुळीच ऐकत नाहीत. शिवाय सरकार व पोलिसांनी सांगितलेले नियम मोडण्यात तर फार पुरुषार्थ वाटतो. परंतु अशी ही विक्षिप्त मंडळी केवळ आणि केवळ आपल्या मित्रांचे ऐकतात त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सुवर्णकाळ म्हणायला हवा ज्यामध्ये आपण आपल्या मैत्रीच्या नात्यावर कायमस्वरूपी लावलेला कलंकित वाक्य कायमचे पुसू शकतो. हे प्रसिद्ध वाक्य आहे ‘आमचा मुलगा साधा सरळ आहे हो पण त्याचे मित्र खराब आहेत’ तसं बघता कुणीही कुणाला बिघडवू शकत नाही परंतु आपल्या आचरणाने सुधारू नक्की शकतो . त्यामुळे वर उल्लेख केलेल्या वाक्याला तसाही कुठला आधार नाही परंतु पुत्र प्रेमाखातर आई-वडिलांचे ते वाक्य मात्र संपूर्ण मैत्रीच्या विश्वाला एक आव्हान आहे त्यामुळे हे आव्हान स्वीकारून आपण आपल्या आचरणातून आपल्या मित्रांसाठी व मैत्रिणीसाठी निश्चितच एक आदर्श घडवू शकतो. एखादा मित्र तुम्हास विनाकारण बाहेर फिरायला आग्रह करत असेल तर त्याला नम्रपणे नकार देऊन या परिस्थितीची जाणीव करून द्या.कदाचित काही मित्र तुमची सुरुवातीस टिंगल करतील परंतु अशाही परिस्थितीत अतिशय धैर्याने तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांच्यावर असलेली परीवाराची जबाबदारी व आपल्या हौसेखातर एकत्र येण्याने होणारे दुष्पपरीणाम समजावून सांगा, अत्यावश्यक असल्यास नक्कीच भेटा परंतु त्याही परिस्थितीत मास्क , शारीरिक अंतरावर लक्ष देऊन त्याचे महत्त्व आपल्या मित्रांना स्वतःच्या आचरणातून समजावून द्या .सरकारने व वैद्यकीय तज्ञांनी कितीही जाहिरातीतून आवाहन केले तरी नागरिक फार गांभीर्याने या गोष्टी पाळतील याबद्दल शंकाच आहे परंतु तीन मित्रांपैकी दोघांनी मास्क लावला तर तिसरा आपसूकच मास्क लावेल, परिस्थितीनुरूप शारीरिक आंतर ठेवेल यात शंकाच नाही .परंतु या सगळ्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही तुमची मैत्री या काळात संपुष्टात आणा.
मित्रांना द्या मानसिक आधार
आधी सांगितल्याप्रमाणे आपली मैत्री दृढ व वृद्धिंगत करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे .कारण वेळ भरपूर असल्यामुळे तुम्ही तुमच्या जिवलग व जुन्या मित्रांशी खूप वेळ फोनवर गप्पा मारू शकता.आता तर ऑनलाईनच्या माध्यमातून आपण खूप सारे मित्र एकत्र येऊन काही चांगले काम करू शकतो .तुम्हाला येत असलेल्या काही कला तुम्ही तुमच्या मित्रांना शिकवू शकता. महिलांची आवडती भिशी पार्टी देखील ऑनलाइन नक्कीच शक्य आहे .आवडीचे पदार्थ बनवण्याची पद्धत तुम्ही व्हिडिओद्वारे सांगू शकता .असे एक ना अनेक खूप प्रकार आहेत की ज्यामुळे आबाल वृद्ध मंडळी पुरुष असो अथवा स्री आपली मैत्री केवळ टिकवूनच नाही तर वृद्धिंगत देखील करू शकतात .परंतु यासोबतच या काळात सर्वात महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे आपल्या मित्राला व मैत्रिणीला मानसिक आधार देण्याचे .बहुतांश नागरिक भयभीत आहेत. वेगवेगळ्या माध्यमांवरील अतिरंजित बातम्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यातच भरीस भर म्हणजे सहज उपलब्ध होत असल्यामुळे काही लोक व्हाट्सअप – फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून चुकीची माहिती प्रसारीत करीत आहेत. अशा वेळी आपली जबाबदारी अधिक वाढली आहे .सदरची माहिती खरी आहे की खोटी याची सत्यता आपण सहज तपासून आपल्या मित्र-मैत्रिणींना भयमुक्त करायचे आहे .
कोरोना रोगाशी लढा
या कोरोनाकाळात मित्र-मैत्रिणी जी मदत करतील ती शक्यतो इतरांना शक्य होत नाही .उदाहरण द्यायचे झाल्यास समजा दुर्दैवाने चुकून तुमचा मित्र अथवा त्याच्या परीवारातील एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित झाली तर सध्याच्या सरकारी नियमानुसार संपूर्ण कुटुंबीयांचे विलगीकरण केले जाते त्यामुळे अशावेळी एखाद्या रुग्णास काही महागडी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी करावयाची असलेले तजवीज वा योग्य वैद्यकीय सेवा पुरवणारी यंत्रणेचा शोध घेणे असो अथवा आर्थिक मदत असो घरातील सर्व लोक विलगीकरणात असल्यामुळे कोणालाही शक्य होत नाही . शिवाय अनाठायी भीतीपोटी इतर नातेवाईक – शेजारीपाजारी देखील मदत करण्यास धजावत नाहीत. अशावेळी आपल्या मित्राची अथवा त्यांच्या कुटुंबास मानसिक आधार देऊन शक्य होईल तितकी मदत आपल्याकडून झाल्यास समोरील व्यक्ती आपल्या मित्रांमध्ये निश्चितच देवदूताचे दर्शन घेईल यात शंकाच नाही .आपण जाणतोच की आपल्याला केवळ रोगाशी लढायचे आहे. संक्रमित व्यक्तीचा तिरस्कार करून चालणार नाही आणि मला याबद्दल विश्वास वाटतो की आपण ही मदत आपल्या मित्र मैत्रिणींसाठी निश्चित कराल. अशा प्रकारची मदत ही व्हाट्सअप वर एखादा हलकाफुलका विनोद वा खोटी माहिती प्रसारित करण्यापेक्षा निश्चितच आपल्या जिवलग मित्रासाठी लाख मोलाची ठरेल .
ऑगस्ट महिन्याच्या प्रथम रविवारी संपूर्ण जगात ‘जागतिक मैत्री दिन’ फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असले तरी आपणा सर्वांची मैत्री अशीच चिरकाल व टवटवीत राहील यात शंकाच नाही .
सर्वांना मैत्रीपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
प्रवीण धर्मराज पाटील,
9422772178,
मैत्री दिन, रविवार, 2 ऑगस्ट 2020

