शेत-शिवारात अंकुरलेल्या कवितांनी जगायला शिकवलं


भुसावळच्या द्वारकाई व्याख्यानमालेत हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांचे भावोद्गार

भुसावळ : कष्टकरी शेतकर्‍याचा पोरगा असल्यानं काळ्या आईच्या कुशीत वाढलो. शेती-माती, पीक-पाणी डोळ्यात साठवत गेलो अन कवितेचं पीक अंकुरत गेलं. बाप म्हणायचा, कवितेचं वेड जोपासू नको, हातात भिकेचा कटोरा येईल पण याचं कवितेने स्वाभिमानाची भाकर व जगण्याचं बळ दिलं. हे बोल आहेत हिंगोली जिल्ह्यातील सावळी खुर्दचे कवी गणेश आघाव यांचे. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ऑनलाईन व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात तृतीय पुष्प गुंफताना कवी आघाव बोलत होते.

कवितेचं गाणं झाल्याचा आनंद…
कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याने दारीद्रय जवळून अनुभवलं. जे उपभोगलं, सोसलं, दिसलं ते काव्यप्रतिभेला आकार देत मांडलं. ‘पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पर्‍यांना पुसती तुम्ही गं कुणाच्या?’ या कवितेने जगभरात ओळख दिली. 30 भाषांत तिचे भाषांतर झाले आहे. देश- विदेशातून प्रतिक्रिया येतात तेव्हा आई- वडीलांनाही गहिवरून येते. असे कवी आघाव म्हणाले.

व्यवस्थेचा केंद्रबिंदू शेतकरी हवा
‘ऊठ बापू पेरत्याला कुण्या गळफासाची आठवण नगं, हातात रूमणं धरून चालणार्‍या काळजात, दुष्काळाच्या दु:खाची धग नको’ ही कविता सादर करताना कवी आघाव यांचे डोळे पाणावले. भूमिपुत्राला केंद्रबिंदू ठेवून प्रगतीच्या वाटा शोधल्या तरच देश समृध्द होईल. शेतकर्‍यांना पायात गाडून विकासाचे इमले बांधणे शक्य नाही. एकाचे हजार दाणे करण्याची क्षमता बळीराजात आहे. पण चुकीच्या व्यवस्थेचा तो बळी ठरतो आहे, अशी खंतही कवी आघाव यांनी व्यक्त केली.

हा तर राज्यातील आदर्श उपक्रम
भाषेची गोडी व रसिकांना कनेक्ट करणारा हा राज्यातील आदर्श उपक्रम आहे, अशा प्रतिक्रिया विदूला तेंडूलकर (पालघर), पी. एस. पाटील ( जामठी, ता. बोदवड), शमीम पटेल (सांगली), डॉ. स्मिता जोशी (अकोला), मनीष गुरचळ (भुसावळ), डॉ. देवयानी पाटील (खिरवड, ता. रावेर), प्रा. सुनील देसले (महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष) यांनी समारोप सत्रात व्यक्त केल्या.

यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे, वक्त्यांचा परीचय समन्वयक अरुण मांडाळकर, सूत्रसंचालन सल्लागार गणेश फेगडे यांनी केले. ऑनलाईन व्याख्यानमाला यशस्वीततेसाठी प्रा. डॉ. गिरीश कोळी, प्रा. नीलेश गुरूचळ, फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !