सखींच्या ऑनलाईन भेटीमुळे आनंद द्विगुणित
मैत्री दिन : मनोरंजन सखी परीवारातर्फे सखी संवाद
भुसावळ : गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे एकमेकांना भेटू न शकल्याने मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील मनोरंजन सखी परीवारातर्फे आयोजित सखी संवाद या ऑनलाईन उपक्रमात एकमेकांच्या भेटीमुळे सखींचा आनंद द्विगुणित झाल्याच्या भावना सहभागी महिलांनी व्यक्त केल्या. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात येतो परंतु यंदा प्रत्यक्ष भेट शक्य नसल्याने आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारता याव्या या हेतूने सखी संवाद हा उपक्रम मनोरंजन सखी परीवारातर्फे आयोजित करण्यात आला.
सखींनी सांगितले अनुभव
प्रारंभी मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांनी उपक्रम आयोजनाचा हेतू सांगून मैत्रिणींना प्रत्यक्ष पाहता व ऐकता यावे यासाठी ऑनलाईन झूम अॅपद्वारे सर्वांना एकत्र आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर भुसावळहून बदली झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी भुसावळच्या कामाचा अनुभव आणि मैत्रीणींशी असलेला संपर्क याबाबत सांगून आता जळगाव येथे बदली झाल्याने यापुढे ऑनलाईनच भेट होत राहील, असे सांगितले. निशा पाटील यांनी गेल्या चार महिन्यांच्या कालावधीतील आपले अनुभव कथन करून प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले. मनीषा ताडेकर यांनी कुटुंबासोबत अधिक वेळ देता आल्याचे सांगून विविध ऑनलाईन उपक्रमात सहभागी झाल्याचे सांगितले. पूजा पाटील यांनी मुली शिक्षणासाठी सातत्याने बाहेर असल्याने कोरोना काळात त्यांच्यासोबत अधिक संवाद साधता आल्याचे सांगितले. मंगला सोनवणे यांनी आपल्या शाळेतील मुलांशी अद्यापही मोबाईलद्वारे संपर्क असल्याचे सांगून घरगुती कामांनाही जास्त वेळ देता आल्याचे सांगितले. रीता तांबट यांनी अध्यात्माची आवड असल्याने वाचन व चिंतनात जास्तीत जास्त वेळ घालविल्याचे सांगितले. नलिनी वानखेडे यांनी शैक्षणिक अनुभव कथन करून कुटुंबाला जास्त वेळ देता आल्याचे सांगितले. सुनीता पाटील यांनी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना साथ दिल्याचे सांगितले. मैत्री दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सखी संवादात गाणी, म्हणी, गोष्टी, नाव घेणे, अनुभव कथन अशी गप्पांची मैफिल रंगली. या सखी संवादामुळे एक नवी भावनिक ऊर्जा व आनंद मिळाला असल्याच्याही प्रतिक्रिया सहभागी महिलांनी व्यक्त केल्या.

