पोलीस पतीसह पाचही जणांना 10 पर्यंत कोठडी


विवाहिता खून प्रकरण : रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : पत्नीच्या खून प्रकरणात पती पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र भगवान सोनवणे याच्यासह सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश व दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) या सर्वांना बुधवारी रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता पाचही जणांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जळाल्याने विवाहितेचा मृत्यू
आशाबाबा नगरातील श्यामराव नगरात राहणार्‍या सोनाली नरेंद्र सोनवणे या विवाहितेचा 10 जुलै रोजी पहाटे जळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणात पती पोलीस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे, सासू प्रमिलाबाई, सासरे भगवान कौतिक सोनवणे, दीर योगेश, दीरानी स्वाती योगेश सोनवणे (सर्व रा.आशाबाबा नगर) व नणंद सरला देशमुख (रा.परभणी) यांच्याविरुध्द 13 जुलै रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या गुन्ह्यात 23 जुलै रोजी खून व हुंडाबळीचे कलम वाढविण्यात आले होते. दोन दिवसापूर्वीच सत्र न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. सर्व पर्याय संपल्याने पाचही जण बुधवारी पोलिसांना शरण आले होते. तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश शिंदे यांनी अटकेतील पोलीस पतीसह पाचही जणांना न्यायालयात हजर केले. न्यायालयात पाचही जणांना 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात मयत विवाहितेची नणंद सरला देशमुख (रा.परभणी) या महिलेला अद्याप अटक झालेली नाही.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !