भुसावळातील गढूळ पाण्याचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या दरबारात
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निवेदन : विविध समस्यांवर केली चर्चा
भुसावळ : शहरवासीयांना गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून या संदर्भात स्थानिक पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देत समस्यांबाबत चर्चा केली. याप्रसंगी भुसावळातील स्मशानभूमीत कुठल्याही नोंदणीविना अंत्यसंस्कार होत असल्याने या संदर्भात दखल घेण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
भुसावळात साथीचे आजार पसरण्याची भीती
भुसावळ कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट त्यांना भुसावळातील समस्यांबाबत निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ, दूषित व दुर्गंधीयुक्त असा पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात दवाखान्यात नागरीकांना असलेला मर्यादित प्रवेश तसेच कोरोनाच्या भीतीने दवाखान्यात जायलादेखील नागरीक घाबरत आहेत. अशा परीस्थितीत शहरवासीयांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरीकांच्या आरोग्याचा विचार करता आपल्यास्तरावरून दखल घ्यावी, अशी अपेक्षाही वर्तवण्यात आली आहे.

