शिरसोलीतील महिलेला चौघांकडून मारहाण
जळगाव : कौटुंबिक वाद झाल्याने माहेरी गेलेल्या विवाहितेच्या आईला मुलीच्या सासरच्या मंडळीकडून मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. विवाहिता छाया श्याम कलाल व श्याम महादेव कलाल (रा. शिरपूर, जि.धुळे) यांच्या कौटुंबिक वाद असल्याने विवाहिता छाया कलाल ह्या मुलासह तालुक्यातील शिरसोली येथील आई-वडीलांकडे राहत होत्या. 5 ऑगस्ट 2020 रोजी विवाहितेची आई जनाबाई दगडू कलाल (55, रा.शिरसोली प्र.न.चिंचपूरा, ता.जि.जळगाव) ह्या घरी असतांना विवाहितेचे पती श्याम कलाल, सासु मिराबाई महादेव कलाल, सिमा कलाल, व माई कलाल (पुर्ण नाव महित नाही, सर्व रा.शिरपूर, जि.धुळे) हे आले. पती श्याम म्हणाला की, माझ्या मुलाला घेऊन जातो व छाया तुमच्याकडेस राहू द्या. यावर जनाबाई कलाल यांनी नकार दिल्याने सासु मिराबाई, सिमा व माई यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. भांडण चालू असतांना जनाबाईचे पती दगडू कलाल आणि मुलगा प्रकाश कलाल अश्यांनी सोडवा-सोडव केली. जखमी अवस्थेत जनाबाई यांना जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जनाबाई कलाल यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासू व इतर दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

