मुक्ताईनगरात नववर्षाच्या प्रारंभी अतिक्रमणावर फिरला बुलडोजर
मुक्ताईनगर : नववर्षाच्या प्रारंभी 1 जानेवारी रोजी रीवर्तन चौकात रोडच्या आजूबाजूला असलेले टपरीधारक, हॉटेल, पत्री शेडचे गटारीवर आलेली टिनपत्रे असे रहदारीला नडणारे अतिक्रमण नगरपंचायतीने हटावल्याने व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
परीवर्तन चौकाने घेतला मोकळा श्वास
परीवर्तन चौकातील जुन्या गावात जाणारा मुख्य रस्ता, भुसावळ रोड, बोदवड रोड , बऱ्हाणपूर रोडला दोन्ही बाजूने असलेले पानटपरी, नाश्त्याची हॉटेल, सलूनचे दुकान, स्टेशनरी कटलरीचे दुकान ,घड्याळाचे दुकान, मोटारसायकल गॅरेज ,चर्मकार यांची दुकान, फळे व भाजीपाला वाल्याची दुकान व आदी अन्य दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने उभारली होती. अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना नगरपंचायतीने 8 दिवस आधी नोटीस बजावल्या होत्या. तरीदेखील अतिक्रमण काढून जागा खाली न केल्याने पूर्व सूचनेनुसार 1 जानेवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काढले तर अतिक्रमण हटवल्यानंतर व्यावसायिकांनी आपले साहित्य खाजगी वाहनातून हलवले. ज्यांनी अतिक्रमण काढले नाही त्यांचे पत्री शेड, टपरी हे जेसीबी मशीनने तोडफोड करून काढण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले.

छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ
हात गाडी वाले टपरीधारक, फळे व भाजीपाला विक्रेते हातावर पोट भरत होते, एकाएकी त्यांचे दुकान हटविण्यात आल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
अतिक्रमण मोहीम राबवीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी डिवायएसपी नरेंद्र पिंगळे, निरीक्षक सुरेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. त्यात वरणगाव ,बोदवड ,सावदा, फैजपूर या पोलिस स्टेशनमधून प्रत्येकी 10 पोलिस कर्मचारी मागविले होते तसेच दंगा नियंत्रण पथक, आरसीसी प्लाटून फोर्स आदींचे कुमक जळगावहून मागविले होते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यांचा मोहिमेत समावेश
अतिक्रमण निर्मूलनासाठी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, ग्रामीण आरोग्य रुग्णालयाचे आरोग्य सेवक, एमएससीबीचे अधिकारी, लाईनमन , सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी सर्व तैनात होते, अग्निशामक दलाची गाडी देखील तैनात होती, औषधी सहित रुग्णवाहिका देखील चौकात उभी होती व जेसीबी ,ट्रॅक्टर ,डंपर इत्यादी वाहने सामान वाहून नेत होती
सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
अतिक्रमण मोहीम राबवीत असताना तहसीलदार श्वेता संचेती, मुख्य अधिकारी अश्विनी गायकवाड, बोदवड पीआय गायकवाड, जग्वार , मोरे, पीएसआय निलेश सोळुंके, पीएसआय भारसके, पोलीस कर्मचारी, एल पी सी, होमगार्ड कर्मचारी आदी तैनात होते.

