भुसावळ पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणणार !


माजी आमदार संतोष चौधरी : भुसावळातील अवैध धंदे चाळीसगावपेक्षा अधिक : कडक तपासणी केल्यास पोत्यांनी निघणार बंदुका

भुसावळ : गत विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी उमेदवाराचा एबी फार्म अचानक गायब करण्यात आला व अनपेक्षित घडले मात्र आता माजी मंत्री खडसे राष्ट्रवादीत आले असून आम्ही एक झालो आहोत. यापुढील भुसावळ नगरपालिकेसह वरणगाव पालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल, असा विश्‍वास माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केला. कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त भुसावळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तेली समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भुसावळातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अवैध सावकारीवर त्यांनी बोट ठेवत गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवती सभेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा कार्याध्यक्ष रवी वरपे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सतीश घुले, धीरज चौधरी, जय चौधरी, आदींची उपस्थिती होती.



राज्याचे न.पा.चे ब्लॉकप्रमुख नेमा
आपल्या आक्रमक शैलीत चौधरी यांनी भाषणाची सुरूवात करीत विधानसभा निवडणुकीपासून पदाधिकार्‍यांमध्ये मरगळ आल्याचे कबुल करीत आता मात्र जोमाने काम करणार असल्याचे सांगत भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत किमान 41 सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आणणार असल्याचा दावा केला तसेच पुढील विधानसभेत जिल्ह्यातील किमान पाच ते सहा आमदार पक्षाचे असतील, असेही सांगितले. भुसावळ विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगत गतवेळी एबी फार्म गायब झाला व अनपेक्षित घडले मात्र यापुढे असे घडायला नको, असेही ते म्हणाले. पालिका स्तरावर राज्यभरात ब्लॉकप्रमुख नेमल्यास पक्षाची ताकद वाढेल, असेही ते म्हणाले. भुसावळात गुन्हेगारी वाढली असून अवैध सावकारीला ऊत आला आहे शिवाय चांगल्या पद्धत्तीने शोध मोहिम राबवल्यास किमान पोतेभर कट्टे आढळतील , असा दावा त्यांनी करीत चाळीसगावपेक्षा भुसावळात दोन नंबरचे धंदे अधिक बोकाळल्याचे सांगितले.

वजन घटवल्यास गोल्ड काईन देणार
सिंगापूरच्या धर्तीवर भुसावळातील साईबाबा ट्रस्टतर्फे आगामी काळात पालिकेवर सत्ता आल्यानंतर जो नागरीक जेव्हढे वजन कमी करेल त्यास त्या कमी केलेल्या वजनाप्रमाणे सोन्याचा शिक्का दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. भुसावळातील समस्या मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाची बैठक लावण्याची विनंती त्यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !