हतनूर धरणाचे पाणी 2 रोजी ओझरखेडा धरणात सुटणार
माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या हस्ते जलपूजन : प्रश्न मार्गी लागल्याने समाधान
मुक्ताईनगर : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा गुरुवार, 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून हतनूर धरणाचे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात येणार आहे. शुक्रवार, 27 ऑगस्ट रोजी ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर अन्य तांत्रिक बिघाड दोन दिवसात दूर करून
येत्या 2 सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात येऊन ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रयत्नाने ओझरखेडा धरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
अॅड.रोहिणी खडसेंचा पाठपुरावा ठरला मोलाचा
शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पूर्ण झाल्याने हतनुरचे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली होहती मात्र दोन वर्षांपासून ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बद असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता वाय.एम.कडलग यांना तत्काळ आठ दिवसात सर्व तांत्रिक बाबी दुर करून योजना कार्यान्वित करून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तळवेल उपसा सिंचन योजनेची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली.




