भुसावळात रेल्वे गार्डची गळफास घेत आत्महत्या
प्रल्हाद नगरातील दुर्दैवी घटना : तीन दिवसांपूर्वीच 31 वर्षीय रेल्वे गार्डने आत्महत्या केल्याचा संशय
भुसावळ : रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीस असलेल्या 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील प्रल्हाद नगरात शनिवारी रात्री उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच तरुणाने गळफास घेतल्याचा अंदाज आहे तर तरुणाने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिलकुमार रमासिस सिंग (31, प्लॉट नंबर 16, गुर्जर कॉलनी, प्रल्हाद नगर, भुसावळ, मूळ रा.शिवनाथपूर, शिगीया, विभूतीपूर, जि.समस्तीपूर, बिहार) असे मयत रेल्वे गार्डचे नाव आहे.
- ही बातमी वाचली का- माजी महसूल मंत्री खडसे म्हणाले : विधानसभा निवडणुकीत अॅड.रोहिणी खडसेंचा पराभव गिरीश महाजनांमुळेच
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
शहरातील प्रल्हाद नगरात अवघ्या सहा दिवसांपूर्वीच कैलास महाजन यांच्या घरात सिंग हे भाड्याने रहावयास आले होते. 31 ऑक्टोबर रोजी ते ड्युटीवरून आल्यानंतर अनेकांनी पाहिले मात्र त्यानंतर ते कुणालाही दिसले नाही तर शनिवारी सिंग यांच्या परीवारातील सदस्यांनी फोन करून सांगितलेे की, सिंग हे फोन उचलत नाही म्हणून रेल्वेतील त्यांच्या मित्रांनी घरात जावून पाहिले जात असता आतून दरवाजा लावला असल्याने पाठीमागील बाजूने दरवाजा तोडून पाहिला असता अनिलकुमार सिंग यांनी किचनमधील लोखंडी आसारीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी येत असल्याचे सिंग यांनी तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वेद ओझा, गौरव आवटे आदींना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. बाजारपेठचे उपनिरीक्षक शांताराम महाजन, हवालदार सुनील जोशी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला तर घर मालक कैलास महाजन यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, शनिवारी रात्री नगरपालिका रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला तर रविवारी शवविच्छेदन करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मयत सिंग यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे ठोस कारण कळू शकले नाही.



