राज्यात 6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस : मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले ‘हे’आवाहन
Heavy rain in the state until July 6: Chief Minister makes ‘this’ appeal to citizens मुंबई (4 जुलै 2026) : मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणार्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत असून पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले
मुंबई-ठाण्यात शाळांना सुट्टी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, रेल्वे सेवेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने आधीच मुंबई आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

‘दर तीन तासांनी देतोय अलर्ट, प्रवास टाळा’
शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित ‘’सहकार गौरव पुरस्कार’ सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीवर सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून आम्ही हाय अलर्ट जारी केला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून दर तीन तासांनी अलर्ट दिला जात आहे. नागरिकांनी हा अलर्ट फॉलो करावा आणि गरज नसेल तर प्रवास टाळावा, अशी माझी विनंती आहे.
खड्ड्यांवरून विरोधकांना फडणवीसांचे उत्तर
पावसाच्या या संकटातच दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे षकनेक्टिंग लिंक’वर दोन खड्डे पडल्याचे समोर आले होते. यावरून विरोधकांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. फडणवीस म्हणाले, कनेक्टिंग लिंकवर जिथे रस्ते जोडले जातात, तिथे दोन खड्डे पडले आहेत. पूर्ण लिंकवर खड्डे पडलेले नाहीत. काम पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात दुसरी लेअर टाकली जाते आणि त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी तपासून पाहिल्या जातात. ही एक इंजिनिअरिंग प्रोसेस आहे. कुठे काही कमतरता असेल तर एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेऊन दुरुस्ती करेल. पण, काही लोकांना फक्त टीका करण्यातच आनंद मिळतो. हरकत नाही, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’. आपण देशातील सर्वात उंच पूल, रस्ते आणि धरणे बांधली आहेत त्यामुळे निव्वळ टीका करणे योग्य नाही.
