दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या
नवी दिल्ली : प्रेमविवाह झालेल्या तरुणीने लग्नाच्या अवघ्या 20 दिवसात आत्महत्या केली. प्रेमविवाहानंतर पतीकडून होणार्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी पती पसार झाला आहे. नेहा चौहान असं आत्महत्या करणार्या तरुणीचं नाव आहे तर राहुल बाथम असं आरोपी पतीचं नाव असून तो पटेल नगर हरगोविंदपुरम येथील रहिवासी आहे.
लव्ह स्टोरीचा करुण अंत
नेहाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी राहुलशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच दोघांनी गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला होता. मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. तिने आरोपी राहुलसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. पण लग्नानंतर सर्वकाही बदललं. लग्नानंतर लगेच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. लग्नाच्या दुसर्या दिवसानंतरच आरोपी राहुल तिला बेदम मारहाण करू लागला होता. पतीला दारूचं व्यसन असल्याचंही नेहाला कळालं. 11 सप्टेंबर रोजी मृत्यूच्या आदल्या दिवशी देखील नेहा आणि राहुल यांच्यात वाद झाला होता. वादानंतर दोघं पती-पत्नी आपल्या घरात झोपले होते. 12 सप्टेंबर रोजी पती राहुल झोपेतून उठला असता, त्याच खोलीत नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.



