पिस्टलाच्या धाकावर बुलढाणा अर्बनचे कर्मचारी ओलीस : दरोडेखोरांनी दिड कोटींचा ऐवज लांबवला
शहागडमधील प्रकार : 25 लाखांची रोकड व ग्राहकांचे सुमारे एक कोटींचे सोने लंपास
जालना : शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेचे कामकाज सुरू असतांना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजेदरम्यान तीन दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करीत बँकेतील सात कर्मचार्यांवर पिस्टल रोखत सर्वांचे मोबाईल जप्त करीत कर्मचार्यांना स्ट्राँग रूमममध्ये कोंडले. एक कर्मचार्याच्या कानशिलाला बंदूक लावून लॉकरची चावी घेत ड्रॉव्हरमधील 25 लाख रोख रकमेसह ग्राहकांनी तारण ठेवलेले दोन ड्रॉव्हरमधील सोने लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. भर दिवसा पडलेल्या दरोड्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
दिड कोटींचा ऐवज लंपास
बँकेतील कर्मचार्यांनी जवळपासच्या नागरीकांना संपर्क केला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला. गेवराई, जि.बीड, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांना कळवून मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सूचना केल्या मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही.



25 लाख रोख रक्कम, 1 कोटींचे दागिने लुटले
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 25 लाखांची रोकड व ग्राहकांचे तारण ठेवलेल्या दहा कोटींच्या दागिन्यातून अंदाजे 1 कोटीचे सोनी दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
