संजय राऊतांचे मोठे विधान : तर 450 शेतकर्यांचे वाचले असते प्राण !
मुंबई : शेतकर्यांसाठी पारीत तीन कृषी कायदे अखेर मोदी सरकारने रद्द केल्यानंतर शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयानंतर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला वर्षभर आधी हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकर्यांचे प्राण वाचले असते, मानवतावादी सरकार शेतकर्यांचा बळी जाताना उघड्या डोळ्यांनी पाहत होतं, अशी टीका राऊत यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका आधीपासूनच आडमुठेपणाची होती. सरकारनं याआधी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. आंदोलकांना दहशतवादी, खलिस्तानी म्हटलं. आंदोलनात दहशतवादी घुसलेत म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. शेतकरी अन्नदाता आहे. या देशाचा आत्मा आहे, याचा विसर सरकारला पडला. पण अखेर सरकारला शेतकर्यांपुढे झुकावं लागलं, असं राऊत म्हणाले.
निवडणुकीत फटका बसेल म्हणून काळे कायदे रद्द
राऊत म्हणाले की, आंदोलनाच्या काळात 450 हून अधिक शेतकर्यांचा जीव गेला. लखीमपूरमध्ये शेतकर्यांना चिरडून मारलं. हरीयाणात शेतकर्यांवर लाठीमार झाला. मात्र त्या परीस्थितीतही शेतकरी मागे हटला नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणुकीत फटका बसेल या भीतीनं तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असं राऊत यांनी म्हटले आहे.



