अन्नदाता शेतकर्याने आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या : राहुल गांधी
मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून मोदी सरकारने तीन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकर्यांमध्ये आनंदाची भावना पसरली आहे. सरकारच्या निर्णयावरून राजकीय पक्षांनी विविध भावनाही व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षानेही, हे शेतकर्यांच्या आंदोलनाचं यश असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करुन आपली भावना व्यक्त केली आहे. अन्नदाता शेतकर्याने आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी व्हिडिओ केला शेअर
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही मोदींच्या या निर्णयावर मत व्यक्त केले आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिलीय. देशातील अन्नदाता शेतकर्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे तसेच राहुल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकर्यांसोबत असून पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे तर सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते.



