यावलच्या वृद्धेचा अपघाती मृत्यू : अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आमोदा ते घार्डी रोडवरील विट भट्टीजवळ एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
बुधवार, 15 डिसेंबर रोजी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील आमोदा ते घार्डीरोड दरम्यान दिलीप कुंभार यांच्या वीटभट्टीसमोर अज्ञात वाहनाने 75 वर्षीय वृध्द महिलेला जोरदार धडक देऊन पसार झाला होता. या धडकेत वृध्द महिला जागीच ठार झाल्या होत्या. या संदर्भात सुरुवातीला जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मयत महिलेची ओळख पटली आहे. मयत महिला खाटीकवाडा, यावल, जि.जळगाव येथील नजमाबी वाहद कदर शेख असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणह मेहबूब खाटीक यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरोधात रविवार, 19 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अनिल मोरे करीत आहे.




